राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना सांत्वनपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:06 IST2021-05-26T04:06:10+5:302021-05-26T04:06:10+5:30
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. परिस्थिती दुःखाची ...

राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना सांत्वनपत्र
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा, असे आवाहन राज यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना केला आहे.
ज्या मनसे पदाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले त्यांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. ही पत्रे पदाधिकाऱ्यांच्या घरी पोहचविण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांकडे देण्यात आली आहे. माहिम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज त्यांच्या विभागातील पत्र पदाधिकाऱ्यांच्या घरी पोहोचवली. आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करू शकतो. इतक्या वर्षांचे आपले नाते क्षणार्धात अनंतात विलीन झाले. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे, राज यांनी या पत्रात म्हटले आहे. आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे मनसेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत असल्याचे पत्रात म्हटले आहे.