Join us  

मोर्चात मुस्लिमांचाही 'मनसे' सहभाग, घुसखोरांविरुद्धच राज ठाकरेंना राग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 5:05 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा पार पडला.

मुंबई - पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर या हजारोंच्या उपस्थितीत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात मुस्लीम बांधवही उत्स्फुर्तपणे सहभागी होते. मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चातील उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, देशातील मुस्लीम हा आमचाच असल्याचंही ठणकावून सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा पार पडला. त्यानंतर आझाद मैदानावरील सभेला राज यांनी संबोधित केले. राज्यभरातून हजारो मनसैनिक या मोर्चासाठी आले होते. या मोर्चात मुस्लीम बांधवही उपस्थित होते. मनसेचा हा मोर्चा मुस्लीम बांधवांविरुद्ध नसून पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसकोरांविरोधात असल्याचे या मुस्लीम बांधवांनी सांगितलं. तर, राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात देशातील आणि महाराष्ट्रातील मुस्लीमांचा हा देश असल्याचं म्हटलं. अनेक मराठी मुसलमान आहेत तिथे दंगली होत नाहीत. पण, जिथे बाहेरून मुस्लीम येत आहेत, तिथेच गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे, असे राज यांनी म्हटले.  

पुण्यात बांग्लादेशीने मराठी आडनाव लावून मराठी कुटुंबातील मुलीशी लग्न लावलं, कालांतराने समजलं तो बांग्लादेशी आहे. मराठी मुस्लीम हा इथलाच आहे. तो कधीही बॉम्बस्फोट घडवत नाही. तो प्रामाणिक आहे. मीरा-भाईंदरमध्ये मुस्लीमच नव्हे तर नायजेरियन लोकं आलेली आहेत. ड्रग्स विकतात, मुलींची छेड काढतात यांच्यावर कारवाई कोण करणार?. यापूर्वी रझा अकादमीने मोर्चा काढला, पोलीस भगिनींवर हात टाकला, एवढी हिंमत कशी होते? यांचा बंदोबस्त आताचं करायला हवा. फक्त दंगल झाली की आपण हिंदू होतो. स्फोट झाले की मेणबत्त्या काढायच्या, असे म्हणत कोरड्या सहानुभूतीवरही राज यांनी राग आवळला.  

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना ह्या देशातून हाकललंच पाहिजे. कारण, भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे म्हणत देशातील आणि मराठी मुस्लीम हा आमचाच आहे, असेही राज यांनी ठणकावून सांगितले.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेमुस्लीमनागरिकत्व सुधारणा विधेयकमुंबई