Join us  

राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 5:31 AM

शिवसेनेला शह देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. स्वत: राज यांनी शुक्रवारी सकाळी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी पुण्यातील २२ मे रोजीची सभा मात्र होणार आहे. या सभेत सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. यासाठी पक्षाच्या पातळीवर जोरदार तयारीही सुरू झाली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू’ असे म्हणत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत यासंदर्भात अधिक भाष्य करणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे.

राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यात आणि उत्तर भारतातही वातावरण तापले होते. शिवसेना आणि मनसेत अयोध्या दौऱ्यावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर, दुसरीकडे भाजपचे उत्तर प्रदेशातील खा. बृजभूषण सिंह यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला होता. राज यांनी या दौऱ्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी करतानाच प्रतिसभेचीही घोषणा केली होती. त्यामुळे वादंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केल्याने राजकीय टीका-टीपणीला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी स्थगिती

- येत्या १५ जूनला शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. 

- त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअयोध्या