राज ठाकरे करणार अयोध्येचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:27+5:302021-02-05T04:30:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात एक दिवसाचा अयोध्या दौरा करणार असल्याची ...

राज ठाकरे करणार अयोध्येचा दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात एक दिवसाचा अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे १ ते ९ मार्चदरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे सांगतानाच मनसेच्या आगामी वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षवाढीसाठी नवनवीन संकल्पनांवर मनसेच्या शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करून, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे.
तर २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात विविध ठिकाणी मनसे मराठीत स्वाक्षरीची मोहीम सुरू करणार आहे. स्वतः राज ठाकरे मुंबई आणि ठाणे येथे सही करण्यासाठी जातील, असे नांदगावकर यांनी सांगितले.