Join us  

Raj Thackeray: मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; प्रबोधनकारांना राज ठाकरेंची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 2:51 PM

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मतीदिन आहे.

मुंबई

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मतीदिन आहे. प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते. प्रबोधनकारांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज ठाकरे यांनी त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर प्रबोधनकारांचं एक वाक्य लिहून त्यांच्या योगदानाची आठवण महाराष्ट्राला करुन दिली आहे.

"मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच!", ही गर्जना आहे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची. फक्त गर्जना करुन ते थांबले नाहीत. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी मराठीजनांचा स्वाभिमान चेतवण्यासाठी वेचलं. महाराष्ट्र धर्माचा विचार मांडण्यासाठी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या जहाल वाणीसह प्रत्यक्ष कृतीचं शस्त्रही त्यांनी अनेकदा उपसलं. लेखक, वक्ते, समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा आज ४८ वा स्मृतिदिन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकारांचा विनम्र अभिवादन, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता.

महात्मा फुले यांना ते आपला आदर्श मानत होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या होत्या. महात्मा फुले यांचा लढा सुरू ठेवण्यासाठी प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले होते. अन्याय रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला होता.

टॅग्स :राज ठाकरेमनसे