Join us  

राज ठाकरेंचं ठरलंय; ईडीच्या नोटिशीला देणार 'असं' उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 8:16 PM

या भेटीत विद्या चव्हाण आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या संवादादरम्यान राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीला काय उत्तर देणार असा सवाल एकाने विचारला

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी भाजपाला टार्गेट केलं जातंय. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. 

या भेटीत विद्या चव्हाण आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या संवादादरम्यान राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीला काय उत्तर देणार असा सवाल एकाने विचारला. त्यावेळी राज यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. ईडीच्या प्रश्नाला उत्तर काय देणार यावर राज यांनी उलट उत्तर देणार असं सांगितले. 

ईव्हीएमविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठविला म्हणून राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकायला हवा. आम्ही मंत्रालयात घुसू असं विद्या चव्हाण यांनी राज ठाकरेंना सांगितले त्यावर भाजपा-शिवसेनेला सत्तेमधून बाहेर काढून मंत्रालयात घुसा असं राज यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, अमित शहांकडे गृहमंत्रिपद आहे. इकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे. म्हणून पोलिसांचा, तपास संस्थांचा गैरवापर केला जातोय. इतके दिवस का लावली नाही ईडीची चौकशी? हे हत्यार किती जणांवर उगारणार?, असा सवाल त्यांनी सरकारला केला. 

तसेच ईव्हीएमविरोधात राज ठाकरे विरोधी पक्षांना एकत्र करत आहेत. राज ठाकरेंनी विरोधकांना एकत्र करुन ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडलं आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे. त्यासाठी राज यांना दडपण्यासाठी सरकारकडून असं राजकारण केलं जात आहे. विरोधकांना घाबरविण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकायचं असेल तर जेलभरो आंदोलन करु असा इशाराही राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिला. 

राज ठाकरेंना पाठविण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा विरोधकांना दडपण्यासाठी वापर केला जात आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :राज ठाकरेअंमलबजावणी संचालनालय