राजभवनने आधीच कळवली होती अनुपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:47+5:302021-02-05T04:30:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सोमवारी गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित ...

राजभवनने आधीच कळवली होती अनुपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सोमवारी गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित करणार असल्याने राज्यपाल साेमवारी शेतकरी शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून आधीच स्पष्ट करण्यात आले होते. यासंदर्भात संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे आणि निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना कळविण्यातही आले होते, असे सांगत राजभवनने याबद्दलचे पत्र आणि चॅट समोर आणले.
राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना दिली होती. संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनंजय शिंदे यांना २२ जानेवारीलाच दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना २४ जानेवारीला लेखी पत्राद्वारे सांगण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेड्डी यांना याबाबतचे लेखी पत्र २४ जानेवारीला मिळाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे आहे, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून २५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता निवेदन स्वीकारतील, असेही धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते. त्यांनी याबाबतच्या स्वीकृतीचा मेसेजही पाठविल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले.
..................