मुंबईः मुलुंड येथील जलवर्धिनी प्रतिष्ठान जलसाठवणुकीबाबत व्याख्यान व माहिती तर देतेच, पण प्रत्यक्ष जागेवर टाक्याही बांधून देते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी या संस्थेने पाणी साठविण्याच्या टाक्या उभारण्याचे काम केले असून, यासाठी संस्थेचे संस्थापक उल्हास परांजपे दशकभराहून अधिक काळ कार्यरत आहेत.राज्यात सरासरी पावसाचे प्रमाणे हे ५०० ते ४ हजार मिलिमीटर आहे. विविध प्रकारे पावसाचे पाणी साठवून ठेवले तर त्याचा वापर वर्षभर करता येणे शक्य आहे. यासाठीच जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांनी व्यावहारिक उपक्रम सुरू केला. यास एका अर्थाने लोकोपयोगी चळवळ म्हणता येईल. एक एकर शेतजमिनीवर साधारणपणे २० लाख लिटर पावसाचे पाणी पडते. मुळात एवढे पाणी शेतीसाठी लागत नाही. परिणामी त्यापैकी काही पाणी साठवता आले तर? यासाठी उल्हास परांजपे यांनी अभ्यास सुरू केला. यातूनच एक एकर जमिनीपैकी दहा टक्के भागात साठवण टाकी उभारल्यास वर्षभर त्यातील पाण्याचा वापर करता येईल, हे लक्षात आले. यातून रायगड व कर्जत तालुक्यात साठवण टाक्या बांधण्यात आल्या. २००१ साली जलवर्धिनीने कामाची रूपरेखा तयार केली. २००३ पासून कर्जत तालुक्यात काम सुरू केले. कुंडापैकी एक कोकण कुंड बांधायचे झाल्यास प्लास्टिकचे कापड वापरून ही टाकी बांधता येते. भाताचा पेंढा वापरून केलेले झाकण लावल्यास जलकुंड झाकल्यामुळे बाष्पीभवन होत नाही. त्यासाठी अंदाजे तीन हजार रुपये एवढा खर्च येतो. या जलकुंडात चार हजार लिटर पाणी साठवता येते.
साठवण पावसाच्या पाण्याची, जलवर्धिनी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:34 IST