उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे ‘पाणी’
By Admin | Updated: October 7, 2014 23:50 IST2014-10-07T23:50:26+5:302014-10-07T23:50:26+5:30
निवडणूक प्रचाराने चांगल्याच तापलेल्या ठाणे जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.

उमेदवारांच्या प्रचारावर पावसाचे ‘पाणी’
ठाणे : निवडणूक प्रचाराने चांगल्याच तापलेल्या ठाणे जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. परतीच्या या पावसाने अचानक हजेरी लावल्याने ठिकठिकाणी सुरू असलेल्या उमेदवारांच्या प्रचारावर चांगलेच ‘पाणी’ पडले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली.
आॅक्टोबर हीटचा तडाखा चांगलाच जाणवू लागल्याने दुपारी १ ते ३.३० वा.पर्यंत प्रचारासाठी कार्यकर्ते फिरत नाहीत. ४ ते रात्री ९ पर्यंत मात्र रॅली, मोटारसायकल रॅली आणि उघड्या जीपमधून उमेदवारांसमवेत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रचार करीत असतात. मंगळवारी सायंकाळी ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि ठाणे शहर या चारही मतदारसंघांत पावसाने अचानक हजेरी लावली.
त्या वेळी नेमक्या विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली सुरू होत्या. या पावसामुळे शहरातील नौपाडा, वर्तकनगर, किसननगर, तीनहातनाका, माजिवडा, घोडबंदर रोड, शिवाईनगर कळवा आणि मुंब्रा या भागातील प्रचार रॅलीतील कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे अगदी भर पावसातही या रॅली अखंडितपणे सुरू होत्या. काही ठिकाणी या रॅली काही काळ थांबविण्यात आल्या होत्या.
ठाण्याच्या सेंट्रल मैदानात बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या मायावती यांचीही त्याच वेळी सभा असल्याने तिथे जमलेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांचीही चांगलीच धावपळ उडाली.