पावसामुळे मुंबईला पुन्हा ब्रेक; पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:32 AM2019-07-09T06:32:40+5:302019-07-09T06:50:10+5:30

कोपरा नाला फुटल्याने नवी मुंबईत पाणीच पाणी : धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

Rains break for Mumbai | पावसामुळे मुंबईला पुन्हा ब्रेक; पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली

पावसामुळे मुंबईला पुन्हा ब्रेक; पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरला सोमवारी जोरदार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले. खारघर परिसरातील कोपरा नाला फुटल्याने पांडवकडा धबधब्याचे पाणी थेट सायन-पनवेल महामार्गावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. गोल्फ कोर्स, टाटा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. तुर्भे एमआयडीसी परिसरातील बोनसई गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. गोवंडी येथे बांधकामाचा भाग कोसळून ११ जण जखमी झाले.


सकाळी ८.३० ते ११.३० या तीन तासांत मुंबईत तब्बल १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला. गावात जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांचे हाल झाले. पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण ओव्हरफ्लो झाले आहे. उरण शहर व गावांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरणही दुथडी भरून वाहू लागले आहे, तर नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील जलसाठाही वाढला आहे.

खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली
मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल या ठिकाणी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोठी दरड पडल्याने पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबविल्या आहेत. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करून फोडण्यात आले. रात्री उशिरा येथील वाहतूक सुरू झाली.


मुंबईतील विमान तसेच लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला. सकाळी काही काळ विमानसेवा ठप्प होती तर तीनही मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या.
ठाणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. सोसायट्यांमध्येही पाणी साचले होते. पावसाने चिखलोली धरण पूर्ण भरले आहे.


आजही मुसळधार
मुंबईत मंगळवारीदेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील २४ तासांत २०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे. तसेच पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

नाशिकमधील धरणसाठ्यात वाढ
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
गंगापूर धरणातील साठा आता ३३.८५ टक्के इतका झाला आहे. दारणा धरण ३८.४१, नांदूरमधमेश्वर ५४.५७, गौतमी-गोदावरी २१.२९, भावली ३९.१२, मुकणे १२ तर कडवा ७.८७ टक्के भरले आहे.
कसारा घाटात वाहतूक संथ...
कसारा घाटात काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे दगड येऊन पडल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून मंदगतीने सुरू आहे.

Web Title: Rains break for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.