Join us

मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 05:42 IST

मुंबई : गुरुवारी रात्री मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच आता पुन्हा कोकण, गोवा, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राला ...

मुंबई : गुरुवारी रात्री मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच आता पुन्हा कोकण, गोवा, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २० व २१ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर २० आॅक्टोबरला मुंबई आणि आसपासच्या परिसरात रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २१ आॅक्टोबरदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २२ ते २३ आॅक्टोबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता २० आॅक्टोबरला आकाश अंशत: ढगाळ राहील. सायंकाळसह रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ आॅक्टोबरला आकाश अंशत: ढगाळ राहील.

गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

...तोपर्यंत वातावरण तापदायकच!

मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे येथील हवेत किंचित गारवा निर्माण झाला होता. शिवाय दुपारच्या वातावरणातील ‘ताप’दायक प्रमाणही कमी झाले होते. उन्हाचा तडाखा कमी बसत असला तरीदेखील उकाड्याचे प्रमाण मात्र कायम होते. उत्तर भारतातून शीतलहरी दक्षिणेकडे वाहत नाहीत तोपर्यंत मुंबईकरांना ‘ताप’दायक उन्हाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :पाऊस