राजापूरला वादळी पावसाचा दणका
By Admin | Updated: April 28, 2015 00:32 IST2015-04-27T23:32:43+5:302015-04-28T00:32:45+5:30
अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू : अनेक ठिकाणी पडझड, संपूर्ण तालुका अंधारात

राजापूरला वादळी पावसाचा दणका
राजापूर : शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री कोसळलेल्या वादळी पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. हसोळ-मुसलमानवाडी येथे झाड अंगावर कोसळून रुक्साना वीर या महिलेचा मृत्यू झाला. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, संपूर्ण राजापूर तालुकाच काळोखात गेला.सोमवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. राजापूर शहरात २ ते ३ तास पाऊस कोसळत होता. यादरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला. मात्र, कोणतीही मोठी हानी झाली नाही. ग्रामीण भागात मात्र पावसासोबत जोरदार वारे वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाचल परिसरातील रायपाटण, काजिर्डा, आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
तहसीलदारांचा तातडीचा दौरा
तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावसामुळे वित्तहानी झाल्याचे कळताच तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी रात्री उशिरा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा धावता दौरा केला. त्यांनी केळवली, हसोळ, रायपाटण, पाचल, आदी भागांना भेट देऊन पाहणी केली.