Join us  

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणाला पावसाचा इशारा; मुंंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाच्या नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 7:11 AM

मुंंबईत ढगाळ वातावरण; काही ठिकाणी पावसाच्या नोंदी; मराठवाड्यात तापमानात वाढ

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी दाट असले तरी ते किनारी भागापासून दूर आहे. मात्र त्याचा प्रभाव कायम आहे. कोकणात रविवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. तर, मुंबईत शनिवारी ढगाळ वातावरण होते. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

७ नोव्हेंबर : दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.८ आणि ९ नोव्हेंबर : कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाची नोंद

दिवाळी साजरी केली जात असतानाच शुक्रवारी रात्री हवामान खात्याने मुंबईला पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, शुक्रवारी रात्री ९ नंतर कुलाबा वेधशाळेत पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :हवामानमुंबई