Join us  

पाऊस परतला; मुंबईकरांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 1:37 AM

गेल्या काही दिवसांच्या उकाड्यावर फुंकर : हवामान बदलाचा परिणाम

मुंबई : दीर्घकाळ विश्रांतीवर असलेला पाऊस शनिवारी मुंबईत परतला आणि सायंकाळी शहर-उपनगरात जोर धरलेल्या पावसाने मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा दिला.

उन्हाचे तब्बल चार महिने मुंबईकरांच्या अंगाची काहिली काहिली होत असतानाच विलंबाने का होईना मान्सून मुंबईत जूनच्या अखेरीस दाखल झाला. मान्सून दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात पावसाने मुंबईकडे पाठच फिरवली. मात्र नंतर हवामानात झालेल्या बदलामुळे तब्बल दोन मोठे पाऊस पडले आणि मुंबईची कोंडी झाली. या दोन मोठ्या पावसानंतर मात्र सरींनी मुंबईकडे पाठ फिरवली. परिणामी हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा उकाड्याला सामोरे जावे लागले. विशेषत: केवळ दाटून येत असलेले ढग, आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारे चढ-उतार आणि ऊन-पावसाचा खेळ, यामुळे मुंबईकरांची दमछाक होऊ लागली.

हवामानात स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असतानाच शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान नोंदविण्यात आले असतानाच शनिवारी मुंबईवर ढगांनी गर्दी केली. सकाळसह दुपारी ऊन पडले असतानाच दुपारी ३ नंतर मात्र मुंबईत ढगांनी काळोख केला. सायंकाळी ४ नंतर ठिकठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला किंचित ठिकाणी तुरळक पडणारा पाऊस नंतर मात्र वेगाने कोसळू लागला. बदलत्या हवामानाने हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारच्या पावसाने दिलासा दिला.

मुंबई राहणार ढगाळ२१ जुलै : शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.२२ जुलै : शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.शनिवारी पाऊस पडल्यामुळे अनेकांनी सहलीचेही नियोजन केले़ त्यामुळे सहलीची ठिकाणी फुल्ल झाली़

टॅग्स :पाऊस