मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह झोडपधारा; ठाणे, रायगड, नवी मुंबईतही संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 04:06 AM2020-08-13T04:06:47+5:302020-08-13T04:07:08+5:30

विजेचा खांब पडल्याने घराचे नुकसान

rain in mumbai with gusty wind | मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह झोडपधारा; ठाणे, रायगड, नवी मुंबईतही संततधार

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह झोडपधारा; ठाणे, रायगड, नवी मुंबईतही संततधार

Next

मुंबई : शहर, उपनगरात गेले काही दिवस विश्रांतीवर असलेल्या पावसाने बुधवारी मुंबईला झोडपून काढले. मुंबईत सकाळपासूनच पावसाने खाते उघडले होते. सकाळी रिमझिम सुरू झालेल्या पावसाने दुपारी जोर पकडला. सायन, माटुंगा, दादर, माहिम, प्रभादेवी, दादर, परळ, लालबाग, महालक्ष्मी, चिंचपोकळी, भायखळा अशा मध्य आणि दक्षिण मुंबईत दुपारी पावसाचा जोर जास्त होता. विशेषत: सोसाट्याचा वारा आणि मोठा पाऊस यामुळे नागरिकांना काही काळ धडकी भरली होती. दुपारनंतर अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता.

मुंबईतील दादर, वरळी, लोअर परळ, लालबागसह लगतच्या परिसरात दुपारी ढग दाटून आले होते. एका ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १७ ठिकाणी झाडे कोसळली. ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. सायंकाळसह रात्रीही पावसाचा जोर कायम होता. संध्याकाळी ५.३० वाजता ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आजही मध्यम ते मुसळधार
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. सोसाट्याचा वारा वाहील. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

रायगडमध्ये जोरदार
अलिबाग : बुधवारी दुपारपासून रायगड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासात सरासरी ४३.७७ मि.मी. पावसाची नोंद झा तर नवी मुंबईत दिवसभरात शहरात ३८.४४ मिमी पाऊस पडला.

ठाण्यात वाहतूककोंडी
ठाणे : ठाणे जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत ३४ मिमी तर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार शहरात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४.६६ मिमी पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने आणि रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. एका ठिकाणी झाड पडून घराचे, तर येऊर येथे विजेचा खांब कोसळल्याने घरांचे किरकोळ नुकसान झाले.

मोखाड्यात सर्वांत कमी पाऊस
पालघर : पालघर जिल्ह्यात सरासरी ४८.८० मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस वसई तालुक्यात ६०.५ मिमी तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात २४.४ मिमी इतका पडला आहे. जिल्हाभरात कुठलीही जीवित व वित्तहानीची घटना घडली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Web Title: rain in mumbai with gusty wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.