पावसाने रायगडला झोडपले
By Admin | Updated: June 19, 2015 21:59 IST2015-06-19T21:59:15+5:302015-06-19T21:59:15+5:30
संपूर्ण जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने झोडपून काढले असून आगामी ३६ तास पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य

पावसाने रायगडला झोडपले
अलिबाग : संपूर्ण जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने झोडपून काढले असून आगामी ३६ तास पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य ८४ दरडग्रस्त गावांमध्ये गुरुवारपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. या गावात सतर्कता कायम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर देशपांडे यांनी दिली.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण २०९०.५० मि.मी. पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत हे पर्जन्यमान तब्बल ९ पट अधिक झाले आहे. गतवर्षी १९ जून रोजी जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १२६.९१ मि.मी. होते. यंदा ते १९७.७४ मि.मी. ने वाढून ३२४.६५ मि.मी.वर पोहोचले आहे.
रायगड जिल्ह्यात कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहा प्रमुख नद्या असून त्यापैकी गाढी नदी वगळता उर्वरित पाच नद्यांच्या जलपातळीत गेल्या चोवीस तासांत विक्रमी पावसामुळे लक्षणीय वाढ झाली आहे.
रोहा तालुका परिसरास पुराचा धोका पोहोचविण्यास कारण ठरणाऱ्या कुंडलिका नदीची डोळवहाळ येथे धोकादायक पूर पातळी २३.१५ मीटर आहे. गेल्या चोवीस तासांत कोलाड येथे ९६ मि.मी. पाऊस झाल्याने, सद्यस्थितीत ही जलपातळी २२.५० मीटरपर्यंत पोहोचली आहे. पाली-सुधागड, जांभूळपाडा, नागोठणे परिसरास पुराचा धोका पोहोचविण्यास कारण ठरणाऱ्या अंबा नदीची नागोठणे येथे धोकादायक पूर पातळी ९ मीटर आहे. सद्यस्थितीत ही जलपातळी ५.२० मीटरपर्यंत पोहोचली आहे.
सावित्री नदीची महाड येथे धोकादायक पूर पातळी ६.५० मीटर असून सद्यस्थितीत ती १.४० मीटरपर्यंत पोहोचली आहे. कर्जत व तालुका परिसरास उल्हास नदीची धोकादायक पूर पातळी ४८.७७ मीटर आहे. सद्यस्थितीत ही जलपातळी ४२.३० मीटरपर्यंत पोहोचली आहे. पनवेल व परिसरास पुराचा धोका पोहोचविण्यास कारण ठरणाऱ्या गाढी नदीची पनवेल येथे धोकादायक पूर पातळी ६.५५ मीटर असून सद्यस्थितीत ही जलपातळी अत्यल्प प्रमाणात वाढून ०.१५ मीटरपर्यंत पोहोचली आहे.