Join us  

मुंबईत पावसाचे ‘कमबॅक’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 6:26 AM

सखल भागात साचले पाणी; मागील २४ तासांत १००.७ मिमी. बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : श्रावण सुरू झाल्यापासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने श्रावणी सोमवारी ‘कमबॅक’ करत मुंबईत धुमाकूळ घातला. रविवारी रात्रीपासूनच अधूनमधून वेगाने कोसळत असलेल्या पावसाने सोमवारी सकाळी ५ वाजल्यापासून वेग पकडला. सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजे मागील २४ तासांत मुंबईत तब्बल १००.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सोमवारच्या पावसाचा रेकॉर्ड मुसळधार म्हणून झाला आहे. कुलाबा येथे ६०.४ आणि सांताक्रुझ येथे १००.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी मुंबईत पाऊस कोसळत असताना हिंदमाता, अंधेरी सबवे येथे पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ वळवण्यात आली. पाणी उपसण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, एका ठिकाणी बांधकाम कोसळले. ८ ठिकाणी झाडे कोसळली. सकाळी पावणेनऊ वाजता पूर्व उपगरातील चेंबूर पांजरपोळ येथील डोंगरावरील माती दोन घरांवर पडली. पत्रे असलेली ही घरे रिकामी होती. त्यामुळे कोणी जखमी झाले नाही.सकाळी जोरदार बरसणाऱ्या पावसाचा वेग दुपारच्या सुमारास तुलनेने कमी झाला. मुंबईतल्या बहुतांश भागात ऊन पडल्याचे चित्र होते. त्यामुळे पहिल्याच श्रावण सोमवारी काही प्रमाणात का होईना; पण ऊन-पावसाचा लपंडाव मुंबईकरांना अनुभवता आला.  दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईच्या कमाल तापमानात ३ अंशांची घसरण झाली. कमाल तापमान २८ आणि किमान तापमान २५ अंश नोंदविण्यात आले, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

अशी होते पावसाची वर्गवारीहवामान खात्याकडून पावसाची मुसळधार ते अतिमुसळधार अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ६४.५ ते ११४.५ मिमी.पर्यंत मुसळधार, ११४.५ ते २०४.५ मिमी. म्हणजे खूप मुसळधार आणि २०४.५ मिमी. व त्यानंतरचा पाऊस अतिमुसळधार समजण्यात येतो. या वर्गवारीनुसार सोमवारचा सकाळचा पाऊस मुसळधार या वर्गवारीतील होता.

टॅग्स :पाऊस