Join us  

केमिकल पावडरचा चेंबूरमध्ये पाऊस; एचपीसीएलच्या प्लांटमधून पावडर पसरली?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:10 AM

यामुळे नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :चेंबूर येथील गव्हाणगाव परिसरात शनिवारी मध्यरात्री हवेमधून केमिकलसदृश सफेद रंगाची पावडर सर्वत्र पसरली. यामुळे नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गव्हाणगाव परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्या असून, एका केमिकल कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही पावडर सर्वत्र पसरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शनिवारी या परिसरात दत्त जयंतीनिमित्त भंडारा तसेच विविध समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रात्री नागरिक खुल्या मंडपातच जेवण करण्यासाठी बसले असता, अचानक ही पावडर हवेत पसरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

या परिसरात गाड्यांवर, झाडांवर तसेच घरांच्या छतावर सफेद पावडरचे थर साचले होते. मात्र, घटनास्थळी केमिकल कंपनीचे कोणतेच अधिकारी तपासणीसाठी न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार २००१ सालीदेखील अशीच घटना येथे घडली होती. वारंवार याची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एचपीसीएल कंपनीच्या प्लांटमधून ही कॅटलिस्ट पावडर या परिसरात पसरली आहे. ही पावडर प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आली असून, त्याचा अहवाल प्राप्त करण्यात येईल. तसेच याप्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - बाळासाहेब घावटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

टॅग्स :चेंबूर