Join us  

सॅलरी स्लिपवर जाहिराती; उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेची नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 9:56 AM

एका बाजूला डिजिटल इंडिया, दुसऱ्या बाजूला सॅलरी स्लिप अजून कागदावरच

मुंबई : तिकीटांचे दर न वाढवता उत्पन्न वाढवण्याकडे रेल्वेनं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्याचे विविध मार्ग शोधून काढण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. यानंतर मध्य रेल्वेनं महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी वेगळाच पर्याय शोधला आहे. मध्य रेल्वे आता कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपवर जाहिराती छापणार आहे. विशेष म्हणजे एका बाजूला सरकार डिजिटल इंडियाला चालना देत असताना, दुसरीकडे रेल्वेकडून अद्याप सॅलरी स्लिप छापल्या जात आहेत. फक्त सॅलरी स्लिपवरच नव्हे, तर वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या बेडशीट आणि नॅपकिनच्या कव्हरवरसुद्धा विविध कंपन्यांच्या जाहिराती छापल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं दिली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदाच्या वित्तीय वर्षात जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळवण्यात पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळेच उत्पन्न वाढवणाऱ्या नव्या संकल्पनांना गांभीर्यानं घेतलं जातं आहे. 'गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या सॅलरी स्लिपवर जाहिराती देण्यास तयार आहेत. जवळपास डझनभर कंपन्यांनी दरवर्षी पाच ते सहा लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे,' असं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. यासारख्या जाहिरातींमधून रेल्वेला जवळपास एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 'रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 36 हजार कर्मचारी काम करतात. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सॅलरी स्लिपवर दरवर्षी अडीच लाख रुपये खर्च केले जातात. या जाहिरातींमुळे कर्मचाऱ्यांच्या स्टेशनरीवर होणारा खर्च आणि अन्य खर्च वाचवता येईल,' असं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.  

टॅग्स :रेल्वे