Join us

रेल्वेला राज्य सरकारच्या प्रस्तावाची अजून प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 06:50 IST

सर्वांसाठी लोकल : प्रवासी संघटनांची संमिश्र मते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतीललोकल सेवा अजूनही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. मर्यादित घटकांसाठी लोकल सेवा सुरू असून त्यामध्ये एक-एक घटकाची वाढ करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. मात्र याबाबतचे पत्र अद्याप रेल्वेला दिलेले नाही.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर लोकल सुरू होतील. मात्र प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही.

सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर निर्णय होईल. पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे.- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

आता जी परिस्थिती आहे ती तीन महिन्यांपूर्वीही होती. राज्य सरकारने अनेकवेळा रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले ते पाळले नाही. राज्य सरकारने परवानगी देण्यास उशीर केला आहे.- मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

सर्वांसाठी लोकल सुरू करताना राज्य सरकारने नियमांचे पालन होईल याची जबाबदारी घ्यावी. सर्वांना प्रवासाची मुभा दिल्यास गर्दी होईल. त्यामुळे सरकारने आणखी वेळ घ्यायला हवा.- सदानंद पावगी, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

टॅग्स :लोकलमुंबईकोरोनाची लस