Join us  

अबब! 5,457 उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 9:08 AM

रेल्वे गाडया, स्थानके, रेल्वेच्या कारशेडमध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे.

मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे. असे असताना सतत धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक पुरती कोलमडली जाऊ शकते. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नव-नवीन उपाय योजना आखल्या जातात. यातच रेल्वे सध्या उंदरांच्या उच्छादामुळे त्रस्त आहे. रेल्वे गाडया, स्थानके, रेल्वेच्या कारशेडमध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे रेल्वेचे दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

जास्तकरुन सिग्नलच्या वायर उंदीर तोडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी आणि उंदरांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या तीन वर्षांत उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 1 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतू इतका खर्च करूनही पश्चिम रेल्वेला फक्त 5457 उंदीर मारण्यात यश आले आहे. 

तीन वर्षांत पश्चिम रेल्वेने उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 1,52,41,689 रुपये खर्च केले आहेत. जर प्रत्येक दिवसाचा हिशोब केल्यास रोज सरासरी 14 हजार रुपये खर्च होत आहेत. एवढे रुपये खर्च करून सुद्धा रोज सरासरी फक्त 5 उंदीर मारले जात आहेत. यासंबंधीची माहिती पश्चिम रेल्वेकडून आरटीआयअंतर्गत समोर आली आहे. यात पश्चिम रेल्वेने सांगितले आहे की, रेल्वेचे डब्बे आणि यार्डात उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करण्यात आले. हे काम करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, कोटी रुपये खर्च करून उंदीर मारण्याचा हा प्रश्न नाही, तर हा खर्च रेल्वेचे नुकसान वाचविण्यासाठी होत आहे. जर उंदरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खर्च केला नाही, तर प्रवासांचे साहित्य उंदीर खराब करतील, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. जर रेल्वेमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू टाकल्या नाहीत, साफ-सफाई असले तर उंदरांवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असेही या अधिकाऱ्यांने सांगितले. 

टॅग्स :रेल्वेमुंबई लोकलमध्य रेल्वे