गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनेप्रभादेवी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील बंद केलेले स्टॉल्स पुन्हा सुरू झाल्याने रेल्वेच्या धोरणाबद्दल सवाल उपस्थित झाला आहे. यापूर्वी गर्दीच्या व्यवस्थापनासाठी हे स्टॉल्स येथून हटविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
प्रभादेवी स्थानकात खाद्यपदार्थांचे एकूण ४ स्टॉल्स असून मधल्या जिन्यासमोरचे २ स्टॉल्स बंद करण्यात आले होते. २०१७ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसदृश येथे अनपेक्षित घटना घडू नये यासाठी स्टॉल्ससह अन्य काही वास्तू हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु अवघ्या ३ महिन्यांतच पुन्हा हे स्टॉल्स सुरू करण्यात आल्याने गर्दी व्यवस्थापनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वेला कोर्टाची भीती?अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्टॉल्स हटविण्याची प्रक्रिया किचकट असून ते बंद केल्यास स्टॉल्स चालक कोर्टामध्ये धाव घेतात. त्यामुळे अगोदरचा अनुभव पाहता पाडकामाच्या प्रक्रियेवर स्थगिती येत असून अधिकाऱ्यांना नाहक कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामध्ये वेळ खर्ची पडत असून इतर कामे खोळंबत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मरिन लाइन्स स्टेशनवर ८ स्टॉल्स असून एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी आहेत की दुकानांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.