Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या मागण्यांबद्दल सहानुभूती, पण लाखो प्रवाशांना शिक्षा का?; चाकरमान्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 11:32 IST

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र झालं.

मुंबईः रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान 'रेल रोको' केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र झालं. पण त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना, लाखो नोकरदारांना, महिला प्रवाशांना बसला. त्यामुळे आम्हाला वेठीस का धरता, असा सवाल अनेक चाकरमानी करत आहेत. तरुणांच्या मागण्यांबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे, त्यांना न्याय मिळावा, नोकऱ्या मिळाव्यात हीच आमचीही भावना आहे, पण कुणाच्या तरी चुकीची शिक्षा ते आम्हाला देत आहेत, अशा भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या. 

'गेल्याच आठवड्यात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला होता. त्याचा कुणालाच त्रास झाला नाही. उलट, विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास अडचण होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीही पायपीट केली होती. त्याला सगळ्यांनीच दाद दिली होती. या आंदोलनाचा आदर्श घेऊन अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनीही शांततापूर्ण आंदोलन करायला हवं होतं. त्यांनाही सगळ्यांचा पाठिंबा मिळाला असता', असं मत एका प्रवाशानं मांडलं. 

'अंबरनाथ ते डोंबिवली हे 20 मिनिटांचं अंतर, पण एक तास झाला तरी अजून डोंबिवली आलेलं नाही. का करतात हे अशी अचानक आंदोलनं?, पूर्वसूचना देऊन काय करावं की. दादरला कसं पोहोचणार आणि कधी?', असा संताप एका महिला प्रवाशानं व्यक्त केला.

एक त्रिकोणी कुटुंब मुलाच्या चेक-अपसाठी निघालं होतं. त्यांना रेल रोको वगैरे झाल्याची कल्पनाही नव्हती. ट्रेन सुटल्यावर त्यांना हे कळलं आणि त्यांनी कपाळावरच हात मारला. कित्येक नोकरदारही सकाळी घाईघाईत प्लॅटफॉर्मवर आले. तिथे अनाउन्समेंट ऐकल्यावर त्यांची 'सटकलीच'. मग फोनाफोनी झाली. काही जण घरी परतले, पण काहींना 'मजबुरी' म्हणून जावंच लागणार होतं. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या नावाने शंखच सुरू केला. 

'मुंबईकरांची जाहीर माफी', असा फलक घेऊन ट्रॅकवर अॅप्रेंटिसचे विद्यार्थी उभे होते, हे खरं. पण, या आंदोलनामुळे चाकरमान्यांचे, विशेषतः महिला प्रवाशांचे, त्यातही काही गर्भवतींचे किती हाल झाले असतील, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण हे आंदोलन शांततामय असलं पाहिजे. लाखो लोकांना वेठीस धरल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, हा 'ट्रेंड' हळूहळू पाहायला मिळतोय. तो बदलण्याची गरज आहे. याआधी झालेल्या 'रेल रोकों'मुळे खरंच किती जणांना न्याय मिळालाय?, हा अभ्यासाचा विषय आहे. पण, या प्रत्येक 'रेल रोको'वेळी मुंबईकरांचे हाल बेहाल झाले होते, हे मात्र नक्की.

ट्विटरवरील काही बोलक्या प्रतिक्रियाः 

टॅग्स :मुंबई रेल रोकोमध्य रेल्वे