भरतीबाबत रेल्वेचा आडमुठेपणा

By Admin | Updated: May 19, 2014 05:04 IST2014-05-19T05:04:05+5:302014-05-19T05:04:05+5:30

प्रवाशांच्या आणि खासकरून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच जीआरपीमध्ये (रेल्वे पोलीस) नव्याने १00 पोलिसांची भरती केली जाणार आहे

Railway stalemate about recruitment | भरतीबाबत रेल्वेचा आडमुठेपणा

भरतीबाबत रेल्वेचा आडमुठेपणा

मुंबई : प्रवाशांच्या आणि खासकरून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच जीआरपीमध्ये (रेल्वे पोलीस) नव्याने १00 पोलिसांची भरती केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर त्यांचा निम्मा पगार काढण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला पत्र देण्यात आले. मात्र अजूनही रेल्वेकडून प्रतिसाद आला नसून जीआरपींना पगार देण्याऐवजी आरपीएफमध्येच (केंद्राचे रेल्वे पोलीस बल) नव्याने भरती करून त्यांनाच पगार देऊ, असा पवित्रा रेल्वेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य, पश्चिम आणि हार्बरवरून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यात १५ लाखांपेक्षा जास्त महिला प्रवासी आहेत. महिला प्रवाशांचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. महिलांची छेडछाड करणे, त्यांच्यावर हल्ले करणे इत्यादी गुन्हे घडत आहेत. गेल्या वर्षात तर रेल्वेत महिलांबाबतीत ७९ गुन्हे घडले असून, यंदा वर्षात चार महिन्यांतच २५ गुन्हे घडले आहेत. त्यामुळे महिला प्रवासी असुरक्षितच असल्याचे दिसते. तत्पूर्वी २0१0 पासूनच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार पुढे येत मनुष्यबळाअभावी रेल्वे पोलिसांना त्यांचे सरक्षण करणे कठीण होऊन बसल्याचे सांगण्यात येत होते. याबाबतचे प्रकरण कोर्टात आल्यानंतर राज्य सरकारने रेल्वे पोलिसांची आणखी नवीन १० पदे लवकरच भरणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता २0१४च्या मार्च महिन्यात राज्य सरकारने रेल्वे पोलिसांची १०० पदे नव्याने भरण्यात येत असल्याचे पत्रच रेल्वे पोलिसांना दिले आहे. जीआरपीला मिळणारा पगार हा राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन मिळून देते. त्यामुळे राज्य सरकारकडून १०० पदांची मंजुरी मिळाल्याचे पत्र आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्यांचा निम्मा पगार रेल्वेकडून देण्यासाठी मंजुरी मिळावी, यासाठीचे एक पत्र रेल्वेला दिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मुळात येत्या एक-दोन वर्षांत आरपीएफचीही (रेल्वे पोलीस बल) भरती होणार असून जीआरपीला पगार देण्यापेक्षा आरपीएफला पगार देऊ, असा पवित्रा घेत रेल्वेने जीआरपीच्या पत्राला प्रतिसाद न दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भरतीनंतरही जीआरपीची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Railway stalemate about recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.