Join us  

दलालांना पकडण्यास रेल्वेचे मिशन ‘धनुष्य’; ९ लाख ४३ हजार रुपयांची केली तिकिटे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:32 AM

२६ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या पाच विभागात ई-तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालांना पकडण्यास सुरुवात केली

मुंबई : रेल्वेकडून दिवाळी आणि नवीन वर्षानिमित्त विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येतात. या एक्स्प्रेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी या एक्स्प्रेसचा उपयोग होतो. मात्र या एक्स्प्रेससह इतर नियमित एक्स्प्रेसचे तिकीट काढून देण्यासाठी तिकीट दलाल सरसावतात. हे दलाल प्रवाशांची गरज बघून दुप्पट-तिप्पटीने लूट करतात. या दलालांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने ‘आॅपरेशन धनुष्य’ सुरू केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वे प्रवासात गर्दी वाढते. यावर पर्याय म्हणून मध्य रेल्वे मार्गावरून दिवाळी विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांची प्रवाशांना माहिती नसल्याने दलाल या गाड्यांचे तिकीट आधीच बुक करतात. त्यानंतर ते जादा पैसे घेऊन विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वेकडून या दलालांविरोधात ‘आॅपरेशन धनुष्य’ सुरू करण्यात आले आहे.

२६ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या पाच विभागात ई-तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालांना पकडण्यास सुरुवात केली. ‘ऑपरेशन धनुष्य’द्वारे ९ लाख ४३ हजार ७२५ रुपयांची २८७ तिकिटे जप्त करण्यात आली. तर, २१ लाख १८ हजार ९७ रुपयांची प्रवास केलेली १ हजार ८ तिकिटे जप्त करण्यात आली. मध्य रेल्वे प्रशासनाने एकूण २३ दलालांना अटक केली.प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन !रेल्वे परिसरात फलक, बॅनर लावून प्रवाशांना तिकीट दलालांपासून सावधान राहण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. आयआरसीटीसी संकेतस्थळ, अधिकृत तिकीट स्रोतांकडून तिकीट काढावे. तिकीट दलालांकडून अनधिकृतरित्या तिकीट काढणे गुन्हा असून यावर शिक्षा केली जाते, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :रेल्वे