रेल्वेमंत्र्यांचे आदेश फेरीवाल्यांकडून धाब्यावर
By Admin | Updated: January 24, 2015 02:03 IST2015-01-24T02:03:09+5:302015-01-24T02:03:09+5:30
रेल्वे स्थानक आणि त्याच्या हद्दीत असणाऱ्या फेरीवाल्यांना हटवा, असे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे पोलिसांना (आरपीएफ) दिले.

रेल्वेमंत्र्यांचे आदेश फेरीवाल्यांकडून धाब्यावर
मुंबई : रेल्वे स्थानक आणि त्याच्या हद्दीत असणाऱ्या फेरीवाल्यांना हटवा, असे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे पोलिसांना (आरपीएफ) दिले. याची सुरुवात दादर स्थानकात गुरुवारपासून करण्यात आली. मात्र फेरीवाल्यांना ‘ना रेल्वेमंत्र्यांची भीती ना रेल्वे पोलिसांची’ असेच काहीसे चित्र शुक्रवारी दादर स्थानकात दिसून आले आणि रेल्वेमंत्र्यांचे आदेश सररासपणे धाब्यावर बसविण्यात आले.
दादर पूर्वेला असणारे भाजपाचे कार्यालय आणि त्याचबरोबर रेल्वेचे कार्यालय गाठण्यासाठी अनेकांना दादर स्थानकातून आणि त्याच्या पादचारी पुलावर असणाऱ्या फेरीवाल्यांमधून वाट काढावी लागते. या फेरीवाल्यांविरोधात प्रवाशांनी आणि अन्य काहींनी रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर दादर स्थानक आणि त्याच्या हद्दीतून फेरीवाला हटावचे आदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आले. त्यानुसार गुरुवारपासून फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच फेरीवाल्यांचा दादर स्थानकांच्या पादचारी पुलावर पुन्हा वावर सुरू झाल्याचे दिसून आले.
दादर स्थानकात मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मोठ्या पुलावर तर मेमरी कार्डची सररासपणे विक्री होत होती. चार ते पाच जण हे कार्ड विकत होते. मात्र त्यांच्या आजूबाजूलाच काय तर लांबपर्यंत एकही रेल्वे पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्याचप्रमाणे हिंदमाता आणि फुलमार्केटला जोडणाऱ्या पादचारी पुलावरही मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वावर होत होता. मात्र मधूनच तीन ते चार रेल्वे पोलीस येताच त्यांची एकच धावपळ उडत होती आणि सोबत विक्रीसाठी असलेला माल लपविण्यासाठी धडपड होत होती. फेरीवाले सर्व माल लपवून झाल्यानंतर रेल्वे पोलीस मात्र त्यांच्यासोबत गप्पांमध्ये रंगत होते.