‘चेन’खोळंब्याने मध्ये रेल्वे हैराण
By Admin | Updated: July 6, 2015 03:28 IST2015-07-06T03:28:57+5:302015-07-06T03:28:57+5:30
सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे अशा नानाविध समस्यांमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा होतच असतो.

‘चेन’खोळंब्याने मध्ये रेल्वे हैराण
मुंबई : सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे अशा नानाविध समस्यांमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा होतच असतो. त्यातच लहानसहान किंवा काही वेळा विनाकारण चेन खेचण्यात येत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या त्रासात भर
पडली आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात साखळी खेचण्याच्या तब्बल १,०७० घटना घडल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबविता यावी यासाठी लोकल किंवा मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये साखळी खेचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा प्रवाशांकडून गैरफायदा घेतला जात असून, या प्रकारांना आळा बसावा यासाठी आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) प्रयत्न करण्यात येत आहेत.
ट्रेन स्वत:च्या परिसरात आल्यावर ती थांबविण्यासाठी तर ट्रेन स्थानकातून सुटू नये आणि आपल्या सहकाऱ्यांना ट्रेन मिळावी यासाठीही काही ग्रुप साखळी ओढतात. दादर, सीएसटी, कल्याण, ठाणे, कुर्ला अशा स्थानकांजवळ चेन खेचल्यास ती सुरू होण्यास साधारण पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो. एका गाडीची चेन खेचल्यामुळे ती लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांनाही उशीर होतो, असे सांगण्यात आले. विनाकारण चेन खेचण्याबद्दल नऊ जणांना तुरुंगवास भोगावा लागला असून, ६ लाख २५ हजार २५0 दंड वसूल करण्यात आल्याचे मध्य रेल्वे आरपीएफकडून सांगण्यात आले.