ग्रामस्वच्छता अभियानात रायगडची आघाडी
By Admin | Updated: August 13, 2014 00:02 IST2014-08-13T00:02:01+5:302014-08-13T00:02:01+5:30
गावाचे गावपण टिकविण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या महामंत्राचे बीजारोपण राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून केले आहे

ग्रामस्वच्छता अभियानात रायगडची आघाडी
पेण : गावाचे गावपण टिकविण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या महामंत्राचे बीजारोपण राज्य सरकारने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून केले आहे. राज्य शासनाच्या अभियानात रायगड जिल्ह्याने भरारी घेतली असून रायगडातील एकूण ८२२ ग्रामपंचायतींपैकी ४५५ ग्रा.पं.ना यापूर्वीच ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला असून १४१ ग्रा.पं.चे प्रस्ताव पुरस्कारासाठी प्रस्तावित आहेत.
स्वच्छता अभियानात तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के कामकाज येत्या वर्षाअखेरीस पूर्णत्वास नेण्याचा संकल्प राजिपचे स्वच्छता व पाणीपुरवठा स्वतंत्र विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
स्वच्छता व पाणीपुरवठा ही ग्रामपंचायतीची महत्वाची अंगे असून स्वच्छता व पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास गावात आरोग्याची गंभीर समस्या उद्भवते. पाण्यापासून तब्बल ८० टक्के रोगांचा प्रादुर्भाव होतो तर अस्वच्छता दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यासाठी राजिपच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने रायगड जिल्ह्याला शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी जिल्ह्यात स्वच्छता अभियानात आघाडीवर असलेल्या तळा तालुक्यात त्याबाबत सर्वप्रथम बैठक घेण्यात आली.
तळा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रा.पं. ना पुरस्कार मिळाला असून शेष राहिलेली ग्रामपंचायत प्रस्तावात आहे. तो पुरस्कार प्राप्त झाल्यास तळा तालुक्याला शासनाचा १० लाख रुपयांचा विशेष पुरस्कार मिळणार आहे.
अभियानात पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय युनिट, स्वतंत्र शौचालय, पाणवठे स्वच्छता, शोषखड्डे, हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता, घर-अंगणाची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शालेय व अंगणवाडी स्वच्छता, कुपोषण, परिसर स्वच्छता, कुपोषणमुक्ती, वृक्षारोपण व संगोपन, आरोग्य तपासणी, पाण्याचे निर्जंतुकीकरण आदींवर भर दिला जातो.(वार्ताहर)