रायगडात गीतेंचा षटकार
By Admin | Updated: May 17, 2014 00:16 IST2014-05-17T00:16:36+5:302014-05-17T00:16:36+5:30
रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांनी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यापेक्षा केवळ २२१० मतांचे मताधिक्य मिळवून, निसटता विजय संपादन केला आहे

रायगडात गीतेंचा षटकार
जयंत धुळप, अलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यापेक्षा केवळ २२१० मतांचे मताधिक्य मिळवून, निसटता विजय संपादन केला आहे. खासदार अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार ०६५ मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ३ लाख ९३ हजार ८५५ मते मिळाली आहेत. खासदार गीते रायगडमध्ये दुसर्यांदा तर कोकणात सहाव्यांदा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला रायगडमध्ये झाल्याचे खासदार गीते यांनी मान्य केले असले तरी शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या पेण विधानसभा मतदार संघात, गीते यांनी मिळविलेले मताधिक्य आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या महाड व शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी यांच्या दापोली विधानसभा मतदार संघात अबाधित राखली गेलेली शिवसेनेची मतदारांशी बांधिलकी याच्या जोरावरच गीते यावेळी विजय संपादन करु शकले आहेत. निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांनी शेकापचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या अलिबाग विधानसभा मतदार संघात मिळवलेले मताधिक्य आणि आपला स्वत:चा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळवले परंतु ते त्यांना विजयापर्यंत घेवून जाण्यास पुरेसे ठरले नाही. शेकापच्याच पुढाकाराने नामसाधर्म्याचे अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यांना ९८४४ मते मिळाली, ती मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या पराभवास एक कारण ठरली. रायगड लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी यशाचा मोठा दावा करुन, चिपळूणहून येथे आयात करुन रिंगणात उतरवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी आमदार रमेश कदम यांना केवळ १ लाख २९ हजार ६७७ मते मिळून त्यांना तिसर्या क्रमांकावर पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांचे आशीर्वाद कदम यांना मिळवण्यात आमदार जयंत पाटील यांनी यश मिळवले होते, परंतु बॅ.अंतुले यांचा आशीर्वाद बिलकुल फळास आला नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीचा विजयाचा दावा मात्र पूर्णपणे फोल ठरला. आपचे उमेदवार माजी सनदी पोलीस अधिकारी डॉ. संजय अपरांती यांना केवळ ६ हजार ७५९ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे यशवंत गायकवाड यांना १० हजार ४९५, समाजवादी पक्षाचे अझीझ मुकादम यांना २ हजार ७६१, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ.आदेश घोणे यांना ३ हजार ३०६, हिन्दुस्तान जनता पार्टीचे संदीप पार्टे यांना ४ हजार २८७ तर अपक्ष उमेदवार मुजफ्फर चौधरी उर्फ मोदी यांना ९ हजार ९४५ मते मिळाली.