रायगड पोलिसांची ‘ज’ ची चतु:सूत्री
By Admin | Updated: May 20, 2015 22:36 IST2015-05-20T22:36:02+5:302015-05-20T22:36:02+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा शेजारी आणि देशाच्या सागरी सीमेचा जिल्हा म्हणून रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे.

रायगड पोलिसांची ‘ज’ ची चतु:सूत्री
अलिबाग : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा शेजारी आणि देशाच्या सागरी सीमेचा जिल्हा म्हणून रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. येत्या दोन महिन्यात जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय अभ्यास पूर्ण करुन, जवान (पोलीस), जनता, जुल्म (गुन्हे) आणि जल (समुद्र) अशा चतु:सूत्रीतून रायगड पोलीस अत्यंत प्रभावीपणे काम करतील, अशी ग्वाही रायगडचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिचय व संवाद बैठकीत बोलताना दिली.
रायगड जिल्ह्यात काम करण्याकरिता आपण एक नियोजन करुन स्वप्न बाळगले आहे. जनतेचा सेवक या नात्याने काम करीत असताना, ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता आपण या चार ‘ज’ची चतु:सूत्री निर्माण केली आहे. माझ्या पोलीस दलातील जवानाच्या व्यक्तिगत असणाऱ्या समस्या दूर केल्यास तो रायगड पोलीस दल म्हणून संघटित परिणामकारकता दाखविण्यास सिद्ध होईल परिणामी त्यास प्राथम्य राहील. सुरक्षिततेच्या खात्रीकरिता जुल्म अर्थात गुन्हे व गुन्हेगार यांना जेरबंद करण्यात कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘जल’ अर्थात देशाची सीमा असणारा अरबी सागरी सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत सक्षम करण्यावर आपला भर राहाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांनी पुढे स्पष्ट केले.
मुंबई २६-११ अतिरेकी हल्ल्यातील शहीद अशोक कामटे यांचा मी शिष्य असल्याचे अत्यंत अभिमानाने व नम्रपणे नमूद करुन, पारदर्शक पोलीस कार्यपद्धती यास जाणीवपूर्वक आपण महत्व देत आलो
सायबर क्राइमच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि ‘सायबर लॅब’ स्थापना असे नियोजन असून प्रभावी कार्यप्रणालीचा भाग म्हणून ‘पोलीस व्हेईकल लोकेशन सिस्टीम’ कार्यान्वित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
४मूळ मध्यप्रदेशातील बालाघाट येथील जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांनी बी.ई.केमिकल इंजीनिअरिंग केल्यानंतर ‘नीतीनिश्चिती’ आणि ‘नीती व्यवस्थापन’ या विषयात एमबीएच्या दोन स्वतंत्र पदव्या घेतल्या असून, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नूतन जिल्हा पालघरचे पहिले जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावून ते आता रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी विराजमान झालेत.
४आमच्या कामातील चुका जरुर दाखवा, त्यातूनच सुधारणा होत असते. गुन्हे तपास कामात वा अन्य कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसिद्धी देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम केलेला अधिकारी वा पोलीस जवान यास प्रसिद्धी देवून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे काम माध्यमांनी करावे अशी अपेक्षा हक यांनी अखेरीस व्यक्त केली.