मुंबई : मतदार याद्यांबाबत वाट्टेल ते बिनबुडाचे आरोप करणारे राहुल गांधी यांनी 'खोटे बोल पण रेटून बोल' हे तंत्र अवलंबिले असून, ते सिरीयल लायर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हायड्रोजन बॉम्ब टाकतो म्हणाले होते; पण फुसका बार निघाला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील मतदार याद्यांबाबत राहुल गांधी बोलत आहेत. विधानसभेतील पराभव काँग्रेसच्या फारच जिव्हारी लागला. कारण, आपलीच सत्ता येणार, असे समजून त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही तयार होते. मात्र, जनतेने त्यांना साफ नाकारले.
निवडणूक आयोगाने अनेकदा राहुल गांधी यांना पुरावे द्यायला सांगितले परंतु ते द्यायला तयार नाहीत. न्यायालयातही जायला तयार नाहीत. संविधानाची चौकट त्यांना मान्य नाही, संविधानाने नेमलेल्या निवडणूक आयोगालाही ते मानत नाहीत. यापूर्वी तोंडावर पडूनदेखील राहुल गांधी खोटेनाटे आरोप करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या काही निर्णयावर देशात नाराजी आहे. ३०० खासदारांनी संसदेबाहेर येऊन मोर्चा काढला. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली, ते सांगत आहेत. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर तरी निवडणूक आयोगाने विश्वासार्हता वाढवायला हवी
शरद पवार, ज्येष्ठ नेते
मतचोरीबाबत पुरावे सादर करावेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले असतानाही राहुल गांधी केवळ आरोप करीत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. जिंकतात तेव्हा आरोप करीत नाहीत. मात्र, हरल्यावर आरोप करतात. ईव्हीएमवरील मतदान कोणाच्या काळात सुरू झाले, याचा अभ्यासही त्यांनी करावा.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते ज्या पद्धतीने भाष्य करत आहे ते बालिशपणाचे आहे. मतदान होत असताना मतदान प्रतिनिधी मतदानाच्या खोलीत बसलेले असतात. व्होट चोरी म्हणजे नेमके काय, हे राहुल गांधी यांनी एकदा समजावून सांगावे.
खा. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट
'राहुल हे मतचोरीचे बादशहा'
ऊठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल हे मतचोरीचे बादशहा आहेत. पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे, अशी टीका करत मतचोरीचा खोटा आरोप केल्याबद्दल राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे.
राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.