Join us  

आपल्या नावाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणाऱ्याबाबत काय बोलायचे?

By मनोहर कुंभेजकर | Published: October 12, 2023 9:39 PM

वाघ नखांबाबत शंका घेणाऱ्यांना अभिनेते राहुल सोलापूरकरांचा सडेतोड जवाब

मनोहर कुंभेजकर, मुंबई-ज्यांना छत्रपतींच्या नावाने फक्त घोषणा द्यायच्या आहेत त्यांना वाघ नखांबाबत शंका वाटणे यात नवीन काही नाही. आपल्या नावाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणाऱ्याबाबत काय बोलायचे असा सवाल करत प्रबोधनकारांनी त्यांना हे नाव का दिले ते त्यांना वाचता आलं असतं तर त्यांनी अशी शंका घेतलीच नसती अश्या शब्दांत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वाघ नखांबाबत शंका घेणाऱ्यांना सडेतोड जवाब दिला.

मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित 'शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच - वाघ नखांच्या निमित्ताने' या कार्यक्रमात ते आज बोलत होते. दादर (प.) येथील स्वा. सावरकर सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. शाहीर नंदेश उमप यांचे सादरीकरण झाले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर, महामंत्री संजय उपाध्याय प्रमुख उपस्थित होते.

अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले, ग्रँट डफकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातील सर्व गोष्टी संग्रहालयाला दिल्या गेल्या. त्याबाबत पुरावे उपलब्ध आहेत. तत्कालीन कागदपत्रांमध्ये ही वाघनखे अफजलखानाला मारण्यासाठी वापरली गेली याचे पुरावे आहेत. शिवाजी महाराजांच्या डाव्या ती हातातील घातली होती याचा उल्लेख ही सापडतो.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला वंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात अहमदाबादमध्ये युद्धनीतीचा कोर्स सुरू झाला आहे. लंडनमध्ये युद्धनीतीच्या अभ्यासक्रमात अश्या गोष्टीचा उल्लेख आहे तो म्हणजे, शत्रूची मानसिकता ओळखत त्याला टप्प्यात आणून शस्त्राचा वापर न करता जवळ आणत शेवटी शस्त्र वापरून त्याचा निप्पात करायचा. या युद्धनीतीचा जगाच्या नकाशावर पहिला प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांची युद्धनीती आपल्याला कधी शिकवली गेली नाही. श्रीकृष्णाची राजनीति छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवहारांमध्ये वापरली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दोन चित्रे आहेत. जी औरंगजेबाच्या दरबारात फ्रेंच चित्रकाराने काढली होती असेही ते म्हणाले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले की, शंकासुरांच्या विचारांचा कोथळा काढणे गरजेचे आहे. वाघनखाच्या बाबतीतील निर्णयाबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला शौर्याचे प्रतीक असलेल्या वाघनखांचे दर्शन घडावे यासाठी प्रयत्न करत आहे. करार झाला. वाघनखे कधी येतील याची तारीख ठरल्यावर आदित्य ठाकरे यांनी वाघनखांबद्दल शंका उपस्थित केली. हे षडयंत्र आहे.महाराष्ट्रातील जनता हे पाहत आहे. छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावा मागणारे लोक उबाठा गटातील होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची गादी प्रिय झाली. त्यांनी छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सावरकरांची जयंती मंत्रालयात साजरी करण्याची परवानगी नाकारली. ते बदनामी करणाऱ्यांच्या संगतीत जाऊन बसले. महेक प्रभू काश्मिरच्या विरोधात फलक घेवुन घोषणा देताना तिच्यावर साधी कारवाई झाली नाही. आता आदित्य ठाकरे वाघ नखांवर शंका घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू होणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला वंदनीय आहे. हे शंकासुर आहेत. महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत विचारधारापोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.

टॅग्स :भाजपाआशीष शेलार