राहुलनेच दिली पोलिसांना हिंट
By Admin | Updated: August 30, 2015 02:13 IST2015-08-30T02:13:18+5:302015-08-30T02:13:18+5:30
पीटर-इंद्राणी यांचा विरोध डावलून राहुल आणि शीना यांनी आपले प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवले होते. २०११मध्ये या दोघांचा खासगीत साखरपुडाही झाल्याची माहिती पुढे येत आहे.

राहुलनेच दिली पोलिसांना हिंट
मुंबई : पीटर-इंद्राणी यांचा विरोध डावलून राहुल आणि शीना यांनी आपले प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवले होते. २०११मध्ये या दोघांचा खासगीत साखरपुडाही झाल्याची माहिती पुढे येत आहे.
२४ एप्रिल २०१२ ला इंद्राणीने शीनाला बोलावून घेतल्यानंतर शीना पुन्हा कधीच दिसली नाही. त्यामुळे सैरभैर झालेल्या राहुलने शीनाला शोधण्याचा, तिच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला. त्याच्याकडे शीनाचा पासपोर्ट होता. जो काल त्याने मुंबई पोलिसांच्या हवाली केला. जर पासपोर्ट माझ्या हाती आहे तर मग शीना अमेरिकेत कशी गेली, हा प्रश्न त्याला सतावत होता. त्याला शीनाचे काही तरी बरेवाईट झाले असेल, याची कुणकूण तेव्हापासूनच होती. त्याने याबाबत थेट इंद्राणीलाच फैलावर घेतले. मात्र शीनाचे दोन पासपोर्ट होते. ती दुसऱ्या पासपोर्टवर अमेरिकेत गेली, अशी थाप इंद्राणीने मारली.
बहुधा त्यानंतरच तीने शीनाच्या मोबाईलवरून राहुलला मेसेज धाडले. मला आता तुझ्याशी संबंध ठेवण्यात काहीही रस नाही. माझे एका परदेशी गोऱ्या तरूणावर प्रेम आहे, असा मेसेज इंद्राणीने शीनाच्या मोबाईलवरून राहुलला धाडला. दरम्यान, मुंबई पोलिसांनी तब्बल तीन वर्षांनी शीना बोरा हत्याकांडाची उकल केली त्यामागे राहुलच असावा, असा अंदाज आहे. त्यानेच मुंबई पोलिसांना श्याम रायची माहिती पोलिसांना दिली आणि रायच्या चौकशीत हे प्रकरण उघड झाले, अशीही चर्चा आहे.
हत्येत वापरलेली ओपेल भाडयाची
इंद्राणी व संजयने शीनाची हत्या ओपेल कोर्सा कारमध्ये केली. ही कार इंद्राणीने भाडयाने घेतली होती, अशी माहिती पुढे आली आहे. या कारचा मालक मुंबईतच वास्तव्यास असून तो कोण हे पोलिसांना समजले आहे. पोलीस कार मालकाचा जबाब नोंदवणार आहेत. तसेच कार पुढील तपासासाठी ताब्यात घेणार आहेत.
‘ते ’अवशेष जेजेत
शुक्रवारी रायगडमधून मुंबई पोलिसांनी जे मानवी हाडे, कवटी असे अवशेष हस्तगत केले ते पुन्हा जेजे रूग्णालयात चाचणीसाठी धाडण्यात येणार आहेत. या चाचणीवरून हे अवशेष मानवाचे की जनावराचे हे स्पष्ट होईल.
मला काही बोलायचे नाही
शीनाचा पासपोर्ट तीन वर्षांपासून राहुलकडे होता मग तो त्याने आधीच पोलिसांना सुपूर्द करून संशय का व्यक्त केला नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माध्यमांनी राहुलला गाठले आणि विचारले तेव्हा या गुन्हयाचा पोलीस तपास करत आहेत. तपास सुरू असताना मी कोणतीही माहिती किंवा प्रतिक्रिया देणार नाही, असे राहुलने सांगितले.