Join us  

राहुल गांधी RSS च्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 9:23 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कुणी अन्य नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

 मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यंना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कुणी अन्य नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्जे यांनी व्यक्त केले आहे. "आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राहुल गांधी यांना अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. हे निमंत्रण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाठवण्यात आले आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अन्य नेते संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही,"असे खर्जे म्हणाले. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात समाजसुधारकांच्या हत्या करणारे मोकाट आहेत. सरकारी यंत्रणेकडून पुरोगामी विचारांच्या लोकांच्या मानवी हक्कांचे हनन सुरू आहे. सरकारविरोधात बोलणा-यांवर दडपशाही केली जाते आहे. त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. काँग्रेस पक्षाने देशात जातीयवाद, धर्मांधता पसरवणा-या या विचारधारेचा नेहमीच विरोध केला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तिरंग्याला राष्ट्रध्वज मानले नाही, ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करित आहेत," असा टोला खर्गे यांनी लगावला. आरएसएसनं पुढील महिन्यात 'भविष्य का भारत' कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याचे निश्चित केल्याचे वृत्त आले होते. आरएसएसचा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राहुल गांधींना देण्यात येण्याचे वृत्त आल्यापासून देशभरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी  लंडनमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींनी संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेशी केली होती. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. 

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघराजकारण