‘रग्गेड सह्याद्री’ सायकलचा थरार
By Admin | Updated: September 20, 2014 00:33 IST2014-09-19T23:56:23+5:302014-09-20T00:33:55+5:30
आज स्पर्धा : देशभरातील सुमारे तीनशे स्पर्धकांचा सहभाग

‘रग्गेड सह्याद्री’ सायकलचा थरार
कोल्हापूर : कोल्हापूर अॅडव्हेंचर स्पोर्टस असोसिएशन (कासा) तर्फे सायकलिंग, ट्रेकिंग आणि नकाशाच्या साहाय्याने दिशादर्शन अशा साहसी क्रीडाप्रकारांचा समावेश असणारी ‘रग्गेड सह्याद्री’ स्पर्धा उद्या,
शनिवारी व रविवारी (दि. २१) अशा दोन दिवस होणार आहेत. स्पर्धेचे
यंदा तिसरे वर्ष आहे. दहा गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत यावर्षी बंगलोर, गुजरात, गोवा, हैदराबाद, हिमाचल प्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापुरातील सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी होणार आहेत.
गेल्यावर्षी २६० स्पर्धक सहभागी झाले होते. यांतील २५० जणांनी स्पर्धा पूर्ण केली होती. त्यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता. २० सप्टेंबर रोजी कोल्हापूर शहरातून स्पर्धेला सुरुवात होईल. सातेरी आणि गगनबावडा परिसरात स्पर्धा होईल. या स्पर्धेचे स्वरूप सांघिक असून ती दहा गटांत होईल. यातील कुटुंब, शालेय, ४० वर्षांवरील, नवोदितांसाठी ३५ किलोमीटर, डॉक्टर, अमॅच्युअर आणि कॉर्पोरेटसाठी ९०, तर डिफेन्स, खुला, महाविद्यालयीन गटांसाठी १३० किलोमीटर अंतर असणार आहे. यातील विजेत्या संघांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे, स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
स्पर्धेसाठी १२० स्वयंसेवकांचा राबता
सुमारे तीनशे स्पर्धक स्पर्धेत सहभागी असून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी ‘कासा’ संघटनेचे १२० स्वयंसेवक तसेच पेट्रोलिंगसाठी २० वाहने, दहा रुग्णवाहिका इतका ताफा सज्ज ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी या स्वयंसेवकांनी ‘ हिमालय एम.टी.बी’ व पुण्याच्या ‘एंड्युरो’ अशा भारतातील खडतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिथे कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.