Join us  

राफेल म्हणजे राहुल फेल, प्रकाश जावडेकरांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 6:45 PM

राफेल विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितल्यामुळे काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मुंबई - राफेल विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितल्यामुळे काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी मुंबईत व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

प्रकाश जावडेकर म्हणाले की, राफेलबाबतच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, राफेलबाबत चोरी झाली आहे व चौकीदार चोर आहे हे न्यायालयानेही मान्य केले. त्याबाबत अवमान याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली. अखेर राहुल गांधी यांनी माफी मागितली. काँग्रेस म्हणजे खोटारडेपणा आणि राफेल म्हणजे राहुल फेल हे या निमित्ताने दिसून आले.

गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्यामुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी पुनःपुन्हा खोटारडा प्रचार चालू केला. पण अशा खोटारडेपणामुळे कधीही सत्याचा पराभव होऊ शकत नाही. वारंवार खोटे बोलण्यामुळे काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता मात्र संपत आहे असा टोला प्रकाश जावडेकरांनी लगावला. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसरा टप्पा उद्या मंगळवारी आहे. जनतेचा मूड ध्यानात घेता भारतीय जनता पार्टीला देशात गेल्यावेळेपेक्षा जास्त, 300 पेक्षा अधिक जागा मिळतील. राज्यात भाजपा महायुतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील व त्यामध्ये बारामती व नांदेडचा समावेश असेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निवडणुकीत दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहनती व प्रामाणिक नेते असून त्यांना पुन्हा एक संधी द्यायला हवी, असे जनतेला वाटते. मोदींच्या हाती देश सुरक्षित असून ते देशाची प्रगती करत आहेत, याबद्दलही लोकांना खात्री वाटते. काँग्रेस आघाडीच्या काळात देशात सातत्याने स्फोट होत होते पण गेल्या पाच वर्षांत जम्मू – काश्मीरचा काही भाग वगळता सर्वत्र शांतता आहे. महागाई नियंत्रणात आहे आणि गरीबांना त्यांच्या योजनांचे पैसे कोणत्याही दलालाशिवाय थेट मिळत आहेत. यूपीएच्या काळात धोरण लकवा होता, दहशतवाद्यांसमोर नरमाईचे धोरण होते, महागाई वाढली होती आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत होती. लोकांना फरक जाणवत आहे असा दावा प्रकाश जावडेकरांनी केला. 

तसेच विरोधी पक्षांचे महागठबंधन अस्तित्वात आलेच नाही, ते विखुरले आहेत. मतदानाच्या दोन टप्प्यांनंतर त्यांच्यामध्ये निराशा निर्माण झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनबाबत तक्रारी करून ते संभाव्य पराभवासाठी सबब निर्माण करत आहेत असा आरोप यावेळी जावडेकरांनी केला.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकराहुल गांधीराफेल डीलकाँग्रेस