अपशब्दांशिवाय राधे माँ बोलत नव्हती
By Admin | Updated: August 25, 2015 03:02 IST2015-08-25T03:02:16+5:302015-08-25T03:02:16+5:30
राधे माँला माझा पती नकुलचे लग्न पंजाबी मुलीशी करायचे होते. त्याने माझ्याशी लग्न केले. त्यामुळे ‘राधे माँ’ने माझा संसार उद्ध्वस्त केला, असा आरोप निकी गुप्ताने (३२) ‘लोकमत’ला

अपशब्दांशिवाय राधे माँ बोलत नव्हती
गौरी टेंबकर - कलगुटकर, मुंबई
राधे माँला माझा पती नकुलचे लग्न पंजाबी मुलीशी करायचे होते. त्याने माझ्याशी लग्न केले. त्यामुळे ‘राधे माँ’ने माझा संसार उद्ध्वस्त केला, असा आरोप निकी गुप्ताने (३२) ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. निकीने दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निश्चय तिने व्यक्त केला.
राधे माँला कधीपासून ओळखता?
१३ एप्रिल २०१२ रोजी माझा विवाह नकुल गुप्तासोबत झाला. त्यापूर्वी काही महिन्यांआधी नकुलचे कुटुंबीय मला पाहायला आले होते. त्याच भेटीदरम्यान ‘राधे माँ’ आपली गुरू आहे, असे नकुलने मला सांगितले होते. तेव्हापासून मी तिला ओळखते. अन्यथा माझा व माझ्या पालकांचा दैवी शक्तीवर विश्वास नव्हता.
तुमच्या लग्नाला विरोध होता का?
तिने नकुलसाठी एक पंजाबी मुलगी पहिली होती. तिला नकुलचे लग्न त्याच मुलीशी लावून द्यायचे होते. मात्र नकुलने आपल्याच समाजात लग्न करायचे ठरविले आणि ठिणगी पडली. कारण ‘राधे माँ’ ही भक्तांचे विवाह जुळवते. तिचा मुलगा हरविंदर सिंग उर्फ निशू याची पत्नी मनीषा हीदेखील लग्नापूर्वी तिची भक्त होती. ती ‘राधे माँ’सोबतच असायची.
लग्नानंतर ‘राधे माँ’ने तुम्हाला कशा प्रकारे त्रास दिला?
लग्नानंतर आम्ही वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पुढे काश्मीरला हनीमूनसाठी जाणार होतो, मात्र लग्नानंतर प्रथम माझे दर्शन घ्यायला हवे होते, असा हट्ट ‘राधे माँ’ने धरला होता. तिने नकुलला फोन केला आणि तातडीने पंजाबला ये, अशी आज्ञा केली आणि आम्ही पंजाबला आलो.
‘राधे माँ’चा जबाब नोंदवण्यास पाच तास का घेतले?
शिवीगाळ केल्याशिवाय ती बोलूच शकत नाही. त्यामुळे सामान्य भाषेत बोलणे तिला जड जात असावे, असे मला वाटते. ती नेहमी शिव्या देऊनच बोले.
तुम्ही तिला गुरू मानलेले का ?
नाही, ती माझी गुरू कधीच नव्हती. निव्वळ माझा नवरा तिला गुरू मानतो आणि मला त्याला दुखवायचे नव्हते. त्यामुळेच मी तिच्या सेवेला जायचे. जिथे प्रसाद म्हणून मला शिव्यांची लाखोली आणि लाथा-बुक्क्यांचा मार खावा लागत होता. ज्याच्यासाठी मी हे सर्व केले त्याने मात्र माझी साथ सोडली आणि आज तिच्या सांगण्यावरून मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
तीला शिक्षा होईल का ?
‘राधे माँ’ने माझा संसार मोडलाय. माझी काहीही चूक नसताना त्याची शिक्षा मी भोगतेय. ज्याचा त्रास माझ्यासह माझा भाऊ आणि आई-वडिलांनादेखील भोगावा लागत आहे. मात्र माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी या सर्व अत्याचाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढत राहीन जोपर्यंत मला न्याय मिळत नाही.
राधे माँला पंजाब पोलिसांनीही समन्स बजाविले आहे. फोनवरून धमकाविल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. पंजाबमधील सुरेंद्र मित्तल यांनी तिच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. राधे माँविरुद्ध बोलत असल्याने आपल्याला फोनवरून धमकाविल्याचा आरोप करीत त्यांनी तिच्यासह संजीव गुप्ता व अन्य चौघांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
‘राधे माँ’कडून अत्याचार - डॉली बिंद्रा
‘राधे मॉँ’ ही आपल्याला अनेकांना भेटण्यासाठी भाग पाडावयाची, तिने अनेकवेळा शिवीगाळ तसेच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार सोमवारी रात्री बोरीवली पोलिसांकडे डॉली बिंद्राने दिली. आज तिने पोलीस ठाण्यात जावून आपले म्हणणे मांडले.