Join us  

राधाकृष्ण विखे लवकरच भाजपत, मंत्री महाजनांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:54 AM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. विखे यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताबाबत चर्चा केली. विखे यांचे पुत्र डॉ. सुजय हे अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. राधाकृष्ण विखे यांनी आज मंत्री महाजन यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, मी कुठलीही गोष्ट अंधारात ठेवणार नाही. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेईन. माझ्यासोबत कोण येणार हे मी निर्णय घेतानाच आपल्याला कळेल.अहमदनगरमधील डॉ. सुजय यांच्या विजयानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी महाजन यांना भेटलो, असे विखे यांनी सांगितले. तथापि, विखे हे लवकरच भाजपत जातील असे त्यांनीच सांगितले असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. विखे हे येत्या काहीच दिवसांत भाजपत प्रवेश करतील आणि त्यांना मंत्रीपदही दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी या आधीच भाजपत जाण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा मी निर्णय घेईन, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल हेही भाजपच्या वाटेवर आहेत. सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार शेखर गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जाहीर प्रचार केला होता. निंबाळकर विजयी झाले. गोरे हेही लवकरच भाजपत प्रवेश करतील, असे म्हटले जाते. याशिवाय काँग्रेसचे चार आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटील