दामदुप्पट गुंतवणूक कंपन्या रडारवर
By Admin | Updated: December 15, 2014 01:11 IST2014-12-15T01:11:27+5:302014-12-15T01:11:27+5:30
: दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या बनावट कंपन्यांविरोधात गुन्हे शाखेने धडक कारवाईचे पाऊल उचलले आहे

दामदुप्पट गुंतवणूक कंपन्या रडारवर
नवी मुंबई : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या बनावट कंपन्यांविरोधात गुन्हे शाखेने धडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.
जास्त व्याज, दाम दुप्पटीचे अमिष दाखवून नागरीकांकडून पैसे उकळणा-या अनेक कंपन्या शहरात चालवल्या जात आहेत. यामध्ये अनेकवेळा मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा झाल्यानंतर या कंपन्यांचे मालक पोबारा करतात. या कंपन्यांची नोंदणीच नसल्याने संबधित मालकांना आणि एजन्टला पकडणे पोलीस यंत्रणेला कठिण होत आहे. गुंतवणुकदारंची फसवणूक करणा-या अशा कंपन्यांवर कारवाईसाठी हितसंबंध संरक्षण अधिनियम देखिल अमलात आलेले आहे. त्याद्वारे शासनाकडून गुंतवणुकदारांची फसवणूक होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. त्याकरीता गुंतवणुकदारांना अमिष दाखवुन फसवणूक करणा-या संस्थांवर कारवाईचे आदेश शासनाने पोलीसांना दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबईच्या गुन्हे शाखा पोलीसांनीही फसव्या कंपन्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. शहरात अशा प्रकारे आमिषे दाखवून गुंतवणूक योजना राबवणा-या कंपन्यांना आणि त्यांच्या एजन्ट्सचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
अशा पध्दतीने आर्थिक फसवणूक करणा-या कंपन्या व व्यक्तींवर पोलीसांनी यापूर्वीही कारवाया केल्या आहेत. मात्र त्यानंतरही झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकजण दाम दुप्पट देणा-या योजनांमध्ये पैसे गुंतवत असल्याने पोलीसांचीही डोकेदुखी वाढली आहे. परंतु नागरिकांनीच गुंतवणूक करताना आवश्यक खबरदारी घेतल्यास फसवणूक टाळता येईल, असा विश्वास गुन्हे शाखाच्या पोलीसांनी व्यक्त केला.यात संबधित कंपनीची नोंदणी आणि कर्मचा-यांची माहिती घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)