सानपाड्यात शिवसैनिकांमध्ये राडा
By Admin | Updated: July 7, 2015 01:52 IST2015-07-07T01:52:04+5:302015-07-07T01:52:04+5:30
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सानपाडा येथे बैठक आयोजित केली होती.

सानपाड्यात शिवसैनिकांमध्ये राडा
नवी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सानपाडा येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर शिवसैनिकांच्या दोन गटांमध्ये राडा झाला. महापालिका निवडणुकीपासून सुरू असलेल्या असंतोषाचा उद्रेक झाल्यामुळे ही घटना झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेने सिनेट निवडणुकीसाठी जोरदार मोेर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईसह नवी मुंबईमध्येही कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. सोमवारी सायंकाळी सानपाडामधील केमिस्ट भवनमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उपनेते विजय नाहटा, खासदार राजन विचारे, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापूर मतदार संघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या व पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यानंतर काही कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये शेरेबाजी सुरू केली. यानंतर विद्या पावगे, मिलिंद सूर्याराव, सोमनाथ वास्कर गटात धक्काबुक्की सुरू झाली. अनेक पदाधिकारी मारामारी सुरू होण्यापूर्वीच तेथून निघून गेले होते. उपस्थितांपैकी काहींनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बघ्याची भूमिका घेतली. निवडणुकीपासून पक्षात दोन गट पडले आहेत. सोमनाथ वास्कर, मिलिंद सूर्याराव व इतर पदाधिकाऱ्यांचा एक गट तर विद्या पावगे व इतर पदाधिकाऱ्यांचा दुसरा गट तयार झाला आहे. या राड्यानंतर गटबाजी अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)