Join us  

‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्याचा निर्णय - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 5:26 AM

आर. आर. पाटील यांच्या स्मारकाला आणखी ८ कोटी ७० लाख देणार

तासगाव/गव्हाण (जि.सांगली) : दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तथा आबांचे स्मृतिस्थळ असलेले ‘निर्मल स्थळ’ वर्षभरात विकसित केले जाईल आणि सांगली येथील स्मारकाला यापूर्वी ९.७१ कोटी रुपये मंजूर आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी ८ कोटी ७० लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी अंजनी (ता. तासगाव) येथे दिली.

अंजनी येथे आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिवादन केले. स्वच्छता अभियानातील ‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्यात येणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. १६ फेब्रुवारीला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार वितरण होणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, आर. आर. आबा जनतेच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळून त्यांनी त्या खात्यांची उंची वाढविली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले. त्यांचे स्मृतिस्थळ असलेले अंजनीतील ‘निर्मल स्थळ’ वर्षभरात विकसित केले जाईल.

टॅग्स :अजित पवारशरद पवारमुंबई