Join us  

तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी ‘स्मार्ट अ‍ॅप’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 2:17 AM

तंबाखूचे वाढते व्यसन ‘स्मार्ट’ पद्धतीने रोखणे अ‍ॅपच्या साहाय्याने सुकर होणार आहे.

मुंबई : तंबाखूचे वाढते व्यसन ‘स्मार्ट’ पद्धतीने रोखणे अ‍ॅपच्या साहाय्याने सुकर होणार आहे. ‘टोबॅको मायनस’ तंबाखूचे व्यसन असलेल्यांसाठी असलेला हा कार्यक्रम आखण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. या कार्यक्रमात स्मार्टफोन अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवणे, कन्सल्टेशन आणि समुपदेशनाची सत्रेही आयोजित करण्यात येतात.

ज्येष्ठ ऑन्कोसर्जन डॉ. रमाकांत देशपांडे यांनी सांगितले की, व्यसनमुक्ती कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त करणे ही काळाची गरज आहे. तंबाखूचे व्यसन असले तर फुप्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोग, दातांचे व हिरड्यांचे आजार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी), अस्थमा, हृदयविकार, तोंडाला होणारा संसर्ग, ब्रॉन्कायटिस आणि आतड्यांचेही विकार होतात. ‘टोबॅको मायनस’ कार्यक्रमामुळे डॉक्टर आणि समुपदेशकांना रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे अधिक सोपे जाईल.

कार्यक्रमाचे संकल्पक वरुण देशपांडे म्हणाले, हा ६ आठवड्यांचा व्यसनमुक्ती कार्यक्रम असून सायको-ऑन्कोलॉजिस्टकडून होणारे वैयक्तिक समुपदेशन आणि युझर यावर लक्ष ठेवणारे स्मार्टफोन अ‍ॅप या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात येते.हे अ‍ॅप दिनचर्येवर लक्ष ठेवू शकते, दररोज प्रेरणा देऊ शकते किंवा तंबाखूविना जगण्याच्या क्लृप्त्या सुचविते आणि युझरचा अनुभव अधिक पर्सनलाइज्ड व्हावा यासाठी माहिती देण्याची युझरला विनंती करते. युझरला जास्त सवय लागली की ते अ‍ॅपला सूचित करू शकतात, जेणेकरून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना स्ट्रॅटजी मिळेल. वागणुकीतील बदल आणि तंत्रज्ञान विकास डोळ्यासमोर ठेवत हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आले आहे.

टॅग्स :तंबाखू बंदीडिजिटलमुंबईआरोग्य