ताक, बिस्कीट आणि पाण्याने रांगेला दिलासा...
By Admin | Updated: November 13, 2016 04:13 IST2016-11-13T04:13:54+5:302016-11-13T04:13:54+5:30
पश्चिम उपनगरातील बँकांसमोर पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना ताक, बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करीत दिलासा देण्यात आला.

ताक, बिस्कीट आणि पाण्याने रांगेला दिलासा...
- मनोहर कुंभेजकर, मुंबई
पश्चिम उपनगरातील बँकांसमोर पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना ताक, बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करीत दिलासा देण्यात आला. सामाजिक सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, याद्वारे माणुसकीचे दर्शन घडविण्यात आले.
दहिसर पूर्वेकडील रावळपाडा येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर नोटा बदलण्यासाठी पाचशेहून अधिक नागरिक रांगेत उभे होते. अशोकवन येथील इंडियन बँक आणि कॉर्पोरेशन बँकसमोरही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिंडोशी येथील बँक आॅफ इंडिया आणि स्टेट बँक, नागरी निवारा जंक्शनवरील सारस्वत बँकेसमोरही रांगा लागल्याची माहिती समाजसेवक अण्णा गुरव आणि प्रशांत जोशी दिली.
शिवसेनेच्या महिला उपविभाग संघटक पूजा चौहान यांनी दिंडोशीतील विविध बँकांसमोरील रांगेतल्या नागरिकांना बाटलीबंद पाण्याचे वाटप केले. वर्सोवा यारी रोडवरील बँक आॅफ इंडिया आणि न्यू इंडिया बँक आणि सातबंगला येथील बँक आॅफ महाराष्ट्र येथील रांगेतल्या नागरिकांना सातबंगला येथील मेजर अरविंद पाटील यांनी ताकवाटप केले. दहिसर पूर्वेकडील विजया बँकेसमोरील नागरिकांना शिवसेना शाखा क्रमांक २ आणि ७तर्फे प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस, प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी पाण्याचे वाटप केले. शिवसेना शाखा क्रमांक ५७तर्फे पीएमसी बँकेसमोर रांगेतील नागरिकांना नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी बिस्कीट आणि पाण्याचे वाटप केले. शिवसेनेचे चांदिवली येथील नगरसेवक ईश्वर तायडे यांनीही रांगेतील नागरिकांना पाणी आणि बिस्किटांचे वाटप करीत दिलासा दिला.
रिक्षा, टॅक्सी चालकांनाही फटका
नोटांचा फटका रिक्षा आणि टॅक्सी चालकांनाही बसला आहे. आठ तासांच्या भाड्यावर वाहन चालविणाऱ्या चालकांना मालकांना २५० रुपये द्यावे लागत आहेत. यातच इंधनाचा खर्च चालकांना करावा लागत असल्याने त्यांना तोटा होत आहे.
शिवाय ओला आणि उबेरलाही याचा फटका बसला आहे. दिवसाला आठ ते नऊ ट्रिप केल्यानंतर सहा ते सात ग्राहकांकडून आॅनलाइन पेमेंट होत आहे, असे उबेरचा चालक संतोष गुप्ता यांनी सांगितले.