फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ‘जैसे थे’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:37 AM2020-02-26T01:37:33+5:302020-02-26T01:37:43+5:30

पुढच्या महिन्यात ठरणार भवितव्य; महापौरांनी बोलावली विशेष बैठक

The question of rehabilitation of the pharaohs is 'As The'! | फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ‘जैसे थे’च!

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ‘जैसे थे’च!

googlenewsNext

मुंबई : फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मार्किंगला पुन्हा एकदा स्थानिक नागरिक व नगरसेवकांकडून विरोध सुरू झाला आहे़ त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न रखडण्याची चिन्हे असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी विशेष बैठक बोलावली आहे़ मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीत फेरीवाला धोरणाचे भवितव्य ठरणार आहे.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पालिकेने सरकारच्या निर्देशानुसार २०१४ मध्ये सर्वेक्षण केले. मात्र ९९ हजार ४३५ अर्जांपैकी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर फक्त १५ हजार ३६३ नवीन फेरीवाले परवान्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याने आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पात्र फेरीवाल्यांच्या जागा फेब्रुवारी अखेरपर्यंत निश्चित करून परवाने वितरित करण्याचे निर्देश संबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परंतु नवीन आखणीत पदपथ, दुकानांसमोर तसेच यापूर्वी फेरीवाला नसलेल्या ठिकाणीही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोर्चे नगरसेवकांच्या घरावर धडकू लागले आहेत. तर दुसरीकडे दुकानदारांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. परिणामी, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेष बैठक बोलावणार असल्याचे महापौरांनी सांगितले़

पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन रेल्वेस्थानक परिसरातून दीडशे मीटर बाहेर तर शाळा, रुग्णालय या परिसराच्या शंभर मीटर बाहेर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा नियम आहे.
दर पाच वर्षांनी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच नगरसेवकांना शहर फेरीवाला नियोजन समितीवर घेणे बंधनकारक असणार आहे.

पालिका प्रशासन भूमिकेवर ठाम...
फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या जागा या पालिका प्रशासन, फेरीवाला प्रतिनिधी, फेरीवाला संघटना प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच निश्चित करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या संकेतस्थळावर या जागा प्रदर्शित करून नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. त्यानंतरच मार्गिकांचे काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहेत़ तर आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय आखणी करू नये, असा युक्तिवाद नगरसेवक करीत आहेत़

न्यायालयाचे निर्देश काय आहेत? शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्थानक, रुग्णालय परिसरात फेरीवाल्यांचे पुनवर्सन करता नियमात काय आहे? या सर्वांची चाचपणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे़
- किशोरी पेडणेकर, महापौर

Web Title: The question of rehabilitation of the pharaohs is 'As The'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.