इंदिरानगरमधील संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी
By Admin | Updated: August 12, 2014 04:10 IST2014-08-12T04:10:53+5:302014-08-12T04:10:53+5:30
इंदिरानगरमधील नाल्यालगतच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. पालिकेने १ कोटी २४ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इंदिरानगरमधील संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी
नवी मुंबई : इंदिरानगरमधील नाल्यालगतच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. पालिकेने १ कोटी २४ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईमध्ये बेलापूर ते दिघा पर्यंत डोंगररांगा आहेत. डोंगरावरील पावसाची पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांच्या कडेला वसाहती तयार झाल्या आहेत. नाल्यातील पाणी वसाहतीमध्ये जावून अनेक वेळा अपघात होत असतात. महापालिका प्रभाग ६१ मधील इंदिरानगर वसाहतीमध्येही प्रत्येक वर्षी पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये जाते. या नाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सदर ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. पूर्वीच्या नगरसेविका संगीता सुतार, शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले, विद्यमान नगरसेवक रामाशेठ वाघमारे यांच्यासह इतरांनीही महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. नागरिकांवर प्रत्येक पावसात अपघाताचे सावट निर्माण होत असून त्या सावटामधून सुटका व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.
महापालिका प्रशासन आतापर्यंत नाला व्हिजनचा बहाणा सांगून संरक्षण भिंतीचे काम पुढे ढकलत होते. या वर्षी येथील एक झोपडी पाण्यात वाहून गेली होती. अखेर प्रशासनाने नाल्यालगत संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी १ कोटी २४ लाख ४० हजार रूपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याविषयी निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून पुढील पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.