अडचणीच्या इमारतींच्या फायर आॅडीटवर प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: May 24, 2015 22:58 IST2015-05-24T22:58:52+5:302015-05-24T22:58:52+5:30
मुंबईच्या काळबादेवीत घडलेल्या दुर्घटनेवरुन मीरा-भार्इंदर शहरात अडगळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतींतील फायर आॅडीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून
अडचणीच्या इमारतींच्या फायर आॅडीटवर प्रश्नचिन्ह
भार्इंदर : मुंबईच्या काळबादेवीत घडलेल्या दुर्घटनेवरुन मीरा-भार्इंदर शहरात अडगळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतींतील फायर आॅडीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात आगीसारखी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
पालिका हद्दीत सुमारे १५ हजारांहून अधिक इमारती अस्तित्वात असून झपाट्याने विकसित होणाऱ्या या शहरात इमारतींची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडत असला तरी त्या पुरविणे पालिकेचे कर्तव्य असल्याचा नागरिकांचा दावा आहे. पायाभूत सुविधांमध्ये अत्यावश्यक गणल्या गेलेल्या अग्निशमन दलाचा समावेश होत असून १२ लाखांवर गेलेल्या लोकसंख्येसाठी ही सेवा तोकडी पडत आहे.
पालिका मुख्यालयांसह प्रभाग कार्यालयांमध्येही अग्निरोधक यंत्रणा नव्हती. मात्र, २१ जून २०१२ रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीमुळे पालिका प्रशासनाला अग्निरोधक यंत्रणा बसविण्याची जाग आली. त्यावेळी फायर आॅडीटवर झालेल्या चर्चेअंती तब्बल ३ वर्षांनी ही यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली असली तरी सध्या ती अर्धवट आहे. शिवाय तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात आलेले फायर एक्स्टिंग्विशरही मुदतबाह्य झाल्याचे उजेडात आले
आहे.