नीट-युजीच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 6, 2024 21:39 IST2024-06-06T21:39:23+5:302024-06-06T21:39:43+5:30

एमबीबीएस, डेंटलच्या प्रवेशासाठी एकेका गुणासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चढाओढ असते. परंतु, यंदा ज्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात, त्या नीट-युजीच्या विश्वासार्हतेविषयीच संभ्रम निर्माण झाला आहे.

Question mark on credibility of NEET-UG, demand for re-examination | नीट-युजीच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

नीट-युजीच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

मुंबई- बिहारमधील पेपरफुटी, ठराविक विद्यार्थ्यांना दिले गेलेले ग्रेसमार्क, एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळणे, अंतिम उत्तर सूची जाहीर केल्यानंतर दुसऱया दिवशी तातडीने निकाल जाहीर करणे अशा विविध कारणांमुळे नीट-युजीच्या निकालाविषयी विद्यार्थी-पालकांमधील रोष वाढत चालला आहे. नीट-यूजीच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित झाल्याने देशभरातून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.

एमबीबीएस, डेंटलच्या प्रवेशासाठी एकेका गुणासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चढाओढ असते. परंतु, यंदा ज्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात, त्या नीट-युजीच्या विश्वासार्हतेविषयीच संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षेतील समन्यायी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पालक-विद्यार्थी समाजमाध्यमांतून आपल्या रागाला वाट करून आहेत. यात मेडिकलचे विद्यार्थी,  डॉक्टर यांचाही समावेश आहे. ही परीक्षा घेणाऱया नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या विश्वासार्हतेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभरातून २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

प्रश्न कशामुळे?

-१०० पर्सेंटाईल मिळालेल्या ६७ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील कसे?

-नीट-युजीचा निकाल १४ जूनला लागणार होता. त्याऐवजी तो दहा दिवस आधीच लोकसभा निवडणुक निकालाच्या धामधुमीत लावण्यात आला. त्याच्या दोन दिवस आधीच एनटीएने अंतिम उत्तरसूची जाहीर केली होती. उत्तरसूचीनंतर निकाल अवघ्या दोन दिवसात तयार कसा झाला, अशी पालकांची शंका आहे.

-तब्बल ६७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. आतापर्यंत दोन-तीन विद्यार्थ्यांनाच १०० पर्सेंटाईल मिळत आले आहेत. एकदमइतक्या मुलांना परफेक्ट गुण कसे मिळाले?

-नीट-युजीचा पेपर बिहारमध्ये फुटल्याची तक्रार होती. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून पेपरच्या बदल्यात ३० ते ५० लाख घेण्यात आल्याची पोलिसांनीच उघड केली होती. यात एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात जवळपास २० जणांना परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती आहे. मात्र या पेपरफुटीची पर्वा न करता घेतलेली परीक्षा कायम ठेवण्यात आली. यावरून सुप्रीम कोर्टात एक याचिका प्रलंबित आहे.

-अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाले आहेत. नीटच्या मुल्यांकनाचे स्वरूप पाहता असे गुण मिळणे शक्य नाही. यावर वेळ कमी पडल्याने आणि एनसीआरटीईच्या जुन्या अभ्यासक्रमावरून एक प्रश्न विचारला गेल्याने दिलेल्या ग्रेस मार्कमुळे असे गुण मिळाले असल्याचा त्रोटक खुलासा एनटीएने केला. मात्र नेमक्या कुठल्या सेंटरवरील, किती विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क दिले गेले हे अजुनही गुलदस्त्यात आहे.

राजकीय पक्षांची उडी

नीट-युजीच्या निकालावरून उभ्या राहिलेल्या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. हरियाणातील एकाच सेंटरवरील आठजणांना १०० पर्सेंटाईल कसे मिळाले, असा प्रश्न काँग्रेसने आपल्या समाजमाध्यमांवर केला आहे.

राज्यातील काही पालकांचा फेरपरिक्षेला विरोध
नीट युजीच्या फेरपरिक्षेची मागणी पालकाकडून होत असली तरी महाराष्ट्रातून काही पालकांकडून याला विरोध होत आहे. हा महाराष्ट्रासाठी फारसा चांगला पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दिलेले ग्ग्रेस मार्क काढून सुधारित निकाल लावा. म्हणजे यामुळे गुणांचा फुगवटा कमी होईल, अशी मागणी या पालकांकडून होत आहे.

Web Title: Question mark on credibility of NEET-UG, demand for re-examination