वाढीव बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: May 14, 2015 00:07 IST2015-05-14T00:07:49+5:302015-05-14T00:07:49+5:30
शहरात विनापरवाना व वाढीव बांधकामांच्या शेकडो इमारती उभ्या राहिल्या असून त्यापैकी गुरू गोविंदसिंग गॅलक्सी इमारतीच्या वाढीव बांधकामावर हातोडा

वाढीव बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर
सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरात विनापरवाना व वाढीव बांधकामांच्या शेकडो इमारती उभ्या राहिल्या असून त्यापैकी गुरू गोविंदसिंग गॅलक्सी इमारतीच्या वाढीव बांधकामावर हातोडा पडला आहे. वादग्रस्त अशा ११० प्रकरणांतील इमारतींत वाढीव बांधकाम झाले असून काही इमारती परवान्यांविना उभ्या राहिल्याचे उघड झाले आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत वाढीव बांधकामांच्या इमारतींचा प्रश्न नव्याने उभा ठाकला असून अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये गेल्या आठवड्यात बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश काढले होते. मात्र, तसे आदेश काढूनही कारवाई झालेली नाही. यावर पडदा टाकण्यासाठीच गुरू गोविंदसिंग गॅलक्सी इमारतीच्या वाढीव बांधकामावर पालिकेने पाडकाम कारवाई केल्याची चर्चा आहे. गुरू गोविंदसिंग गॅलक्सी, तळवलकर जिमसमोरील बहुमजली इमारत, पवई चौकातील रेल्वे रुळांलगतच्या इमारतीसह ११० वादग्रस्त प्रकरणांतील इमारतींमध्ये वाढीव बांधकामे आहेत. ही बांधकामे वाचविण्यासाठी बिल्डर लॉबी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. बांधकाम परवाना न घेता उभ्या राहिलेल्या इमारतींवर पाडकाम कारवाईचे आदेश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी दिले होते.