Join us  

सोसायटीच्या आवारातच क्वारंटाईन सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 8:06 PM

उत्तर मुंबईत आता बहुमजली सोसायटीच्या आवारातील व्यायामशाळा,कॉन्फरस हॉल,क्लब हाऊस आणि अन्य जागेतच सुसज्ज क्वारंटाईन सेंटर साकारले आहे.

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : एकीकडे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 50000 च्या वर गेली असतांना,रुग्णांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही,उपचार मिळत नाही.त्यामुळे काही वेळा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी आहेत.यावर मात करत उत्तर मुंबईत आता बहुमजली सोसायटीच्या आवारातील व्यायामशाळा,कॉन्फरस हॉल,क्लब हाऊस आणि अन्य जागेतच सुसज्ज क्वारंटाईन सेंटर साकारले आहे.याठिकाणी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला गृहनिर्माण सोसायटीचा रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला उपचार मिळणार आहेत.

कांदिवली पश्चिम,महावीर नगर येथील विश्वदीप हाइट्स या बहुमजली इमारतीत बेड, डॉक्टर, पीपी किट्स, ऑक्सिजन सिलेंडर,स्वयंपूर्ण शौचालयांनी बंदिस्त करून सुसज्ज क्वारंटाईन सेंटर साकारले आहे. तर आज बोरिवली पश्चिम राम नगर येथील ऑरा बी प्लेक्स या बहुमजली इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज क्वारंटाईन सेंटर साकारले आहे.या सेंटरमध्ये नर्स,डॉक्टर आणि अन्य सुविधा उपलब्ध असून विशेष म्हणजे रुग्णांना घरचे सकस अन्न मिळणार आहे.यामुळे सरकारी व खाजगी हॉस्पिटलचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात अश्या प्रकारचे क्वारंटाईन सेंटर उभारण्यास परवानगी द्या अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त इक्बाल सिग चहल यांच्याकडे मागणी केली होती. पालिका प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर उभारतांना अटींची पूर्तता करा असे सांगत याला सकारात्मक प्रतिसाद देत पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व परिमंडळ 7 चे पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी  कायदेशीर परवानगी दिली. कोरोना रुग्णांनी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.कोरोनाची लक्षणे दिसल्यावर नागरिक  त्याकडे सुरवातीला दुर्लक्ष करतात. वेळेवर उपचार घेत नसल्याने आजार बळावतो.रिपोर्ट यायला वेळ लागतो. यात रुग्णांचे 7 ते 8 दिवस जातात. मग धावपळ करून हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाही.यामध्ये कोरोनाचे कोविड मध्ये रूपांतर होऊन त्यांचा आजार बळावतो. त्यामुळे उत्तरं मुंबईतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि त्यांना वेळीच उपचार मिळण्यासाठी  सोसायटीच्या आवारात अश्या प्रकारचे कोरोना रुग्णालय उभारण्यास परवानगी द्या अशी संकल्पना मुख्यमंत्री व पालिकेकडे मांडली अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. उत्तर मुंबईतील सहा विधानसभा क्षेत्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अश्या प्रकारची क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खासदार शेट्टी यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई