विरोधी पक्षनेतेपदी चौगुले
By Admin | Updated: May 10, 2015 04:35 IST2015-05-10T04:35:58+5:302015-05-10T04:35:58+5:30
शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज नगरसेवक असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

विरोधी पक्षनेतेपदी चौगुले
नवी मुंबई : शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज नगरसेवक असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महापौरपदाएवढेच विरोधी पक्षनेतेपदालाही महत्त्व असते. यावेळी पहिल्यांदा विरोधी पक्षातील नगरसेवकांची संख्या ४४ पर्यंत गेली आहे. ३८ संख्याबळ असलेल्या शिवसेनेमध्ये नामदेव भगत, शिवराम पाटील, एम. के. मढवी, विजय चौगुले असे अनेक दिग्गज नगरसेवक निवडून आले आहेत. ही निवडणूक शिवसेनेने सामूहिक नेतृत्वाखाली लढली. ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विजय नाहटांकडे सूत्रे होती. विजय चौगुले यांना निवडणुकीदरम्यान काही प्रमाणात डावलण्यात आले होते. यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. ऐरोली मतदारसंघामध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असल्यामुळे अखेर विजय चौगुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
१२ वे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झालेले चौगुले एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक होते. आतापर्यंत त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकदा व ऐरोली मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. महापालिकेत त्यांची दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी स्थायी समिती सभापती म्हणून व त्यापूर्वी सिडको संचालक म्हणून काम केले आहे. आक्रमकपणासाठी ते प्रसिद्ध आहेत. महापालिकेत सत्ताधाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.